पीटीआय, नवी दिल्ली
देशातील विमा क्षेत्राची नियामक असलेल्या भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाचे (इर्डा) विद्यमान अध्यक्ष देबाशीष पांडा यांच्या विहित कार्यकाळाची मुदत १३ मार्चला संपत असल्याने, नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून, केंद्रीय अर्थमंत्रालयाने यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. पात्र उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिलपर्यंत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इर्डाचे अध्यक्ष पांडा हे आधी केंद्रीय अर्थमंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांनी १४ मार्च २०२२ रोजी इर्डाच्या अध्यक्षपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार असल्याने नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवार मिळेपर्यंत पांडा यांना कार्यभार सांभाळण्यास सांगितले जाऊ शकेल. इर्डाने या संबंधाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात, उमेदवाराला किमान ३० वर्षांचा संबंधित क्षेत्राचा अनुभव असावा, अशी अट असून, तो केंद्र सरकारमध्ये सचिव अथवा राज्यांमध्ये समकक्ष पदांवर कार्य केलेला असावा, असेही म्हटले आहे.

इर्डाच्या अध्यक्षपदासाठी खासगी क्षेत्रातील व्यक्तीही अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांना मोठ्या वित्तीय संस्थांमधील मुख्य कार्यकारी अथवा समकक्ष पदांवरील अनुभव आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ६३ वर्षांपेक्षा जास्त नसावे, असेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विमा नियामक व विकास प्राधिकरण कायदा १९९९ नुसार ६५ वर्षांवरील व्यक्ती अध्यक्षपदी राहू शकत नाही. इर्डा अध्यक्षांना दरमहा ५.६२ लाख रुपयांचे एकत्रित वेतन, तसेच निवासस्थानासह मोटारीची सुविधा प्रदान केली जाते.