Finance Ministry on Hindenburg Research : हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात थेट सेबीच्या अध्यक्षांनाच लक्ष्य करण्यात आल्यामुळे याचे पडसाद आर्थिक क्षेत्रापासून राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. हा अहवाल म्हणजे सेबीच्या विश्वार्हतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचं प्रत्युत्तर संस्थेच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी दिलंय. दरम्यान, अदाणी समूहानेही याप्रकरणी खुलासा केला आहे. तर, आता वित्त मंत्रालयाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
वित्त मंत्रालयातील इकॉनॉमिक अफेअर्सचे सचिव अजय सेठ म्हणाले की, “नियामक आणि संबंधित व्यक्ती या दोघांनीही प्रतिक्रिया दिली असल्याने या मुद्द्यावर सरकारकडे सांगण्यासारखे आणखी काही नाही.” नॉर्थ ब्लॉकच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. अजय सेठ हे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव असून सेबी बोर्डात अर्धवेळ सदस्य आहेत. तर, यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.
माधबी पुरी बुच यांच्यावर आरोप करण्यात आल्याने त्या सेबीचं अध्यक्षपद सोडणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजय सेठ म्हणाले, संबंधित व्यक्ती आणि नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे सरकारकडून अधिक काही सांगता येणार नाही.”
हिंडेनबर्गच्या आरोपांवर माधबी पुरी बूच यांचं स्पष्टीकरण काय?
माधबी पुरी हूच यांनी अदाणी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्गने शनिवारी केला. त्यामुळे सेबी अदाणी घोटाळ्यावर कारवाई करण्यास उत्सुक नसल्याचा दावाही करण्यात आला होता. हिंडेनबर्गच्या या आरोपांना निवदेनाद्वारे उत्तर देत बूच यांनी रविवारी आपली बाजू मांडली. अहवालात उल्लेख केलेल्या आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटने प्रवर्तन केलेल्या फंडामधील गुंतवणूक सिंगापूरस्थित खासगी नागरिक म्हणून केली होती आणि सेबीचे पूर्ण वेळ सदस्य होण्यापूर्वी दोन वर्षे आधी केली होती, असे माधबी आणि धवल बूच यांनी स्पष्ट केले.
धवल बूच हे २०१९ पासून ब्लॅकस्टोनचे वरिष्ठ सल्लागार आहेत आणि ते त्या कंपनीच्या बांधकाम व्यवसायाशी संबंधित नाहीत. तसंच, माधबी बूच या २०१७ मध्ये सेबीच्या पूर्ण वेळ सदस्य झाल्यानंतर त्यांच्या दोन सल्लागार कंपन्या तातडीने निष्क्रिय झाल्या आहेत, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
अदाणी यांचं स्पष्टीकरण काय?
भांडवी बाजाराकडे सादर केलेल्या निवेदनात सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत, असे अदाणी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या निवडक माहितीची मोडतोड करून पूर्वनिर्धारित निष्कर्ष काढण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्येच अदाणी समूहाविरोधातील आरोप फेटाळले असल्याचेही कंपनीचया उत्तरात नमूद करण्यात आले असून हिंडेनबर्ग केलेल आरोप द्वेषपूर्ण, खोडसाळ आणि फसवे असल्याची टीका अदाणी समूहाने केली आहे.