पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मजबूत देशांतर्गत मागणी, ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि वाढती गुंतवणूक पातळी याच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील, असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने व्यक्त केला आहे. परिणामी मार्चमध्ये अंदाजण्यात आलेल्या ७ टक्क्यांच्या तुलनेत, तिने चालू आर्थिक वर्षासाठी विकासदराचा अंदाज ७.२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

पुढील आर्थिक वर्ष म्हणजेच २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांसाठी, फिचने अनुक्रमे ६.५ टक्के आणि ६.२ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. ग्रामीण भागातील मागणी सुधारणे आणि महागाई दर नियंत्रणात राहण्याच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.२ टक्के दराने वाढण्याचा अंदाज जून महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनेदेखील व्यक्त केला आहे.

देशांतर्गत आघाडीवर गुंतवणुकीत वाढ होत राहील. मात्र अलीकडील तिमाहींपेक्षा तिचा वेग कमी असेल, तर खासगी क्षेत्रातून गुंतवणूकदेखील वाढण्याची शक्यता आहे. सेवा आणि निर्मिती क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांकदेखील सतत वाढ दर्शवीत आहेत. नुकत्याच आलेल्या उष्णतेच्या लाटेने सामान्य लोकांसह अर्थव्यवस्था होरपळली असली तरी आगामी मान्सूनचा हंगामात परिस्थिती सामान्य होण्याची चिन्हे आहेत. त्यापरिणामी महागाई दर कमी होईल असे ‘फिच रेटिंग्ज’ने अहवालात म्हटले आहे. विद्यमान आर्थिक वर्षात देशांतर्गत मागणी, विशेषत: गुंतवणूक आणि वाढता ग्राहक उपभोग हे वृद्धीचे मुख्य चालक असतील.

हेही वाचा >>>अस्थिर बाजारात हायब्रिड, मल्टी ॲसेट श्रेणी सर्वोत्तम

व्याजदरात पाव टक्का कपात शक्य

देशाची अर्थव्यवस्था सरलेल्या मार्च तिमाहीत ७.८ टक्क्यांच्या विस्तारासह संपूर्ण आर्थिक वर्षात (२०२३-२४) ८.२ टक्क्यांनी वाढली. तर वर्ष २०२४ च्या अखेरीस महागाई दर ४.५ टक्के आणि २०२५ आणि २०२६ मध्ये सरासरी ४.३ टक्क्यांपर्यंत नरमण्याची ‘फिच’ची अपेक्षा आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेकडून विद्यमान वर्षात रेपो दर २५ आधारबिंदूंनी अर्थात पाव टक्क्याने कमी करून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणले जाण्याची अपेक्षाही या जागतिक संस्थेने व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitch revised its growth forecast to 7 2 percent print eco news amy
Show comments