मुंबई: भांडवली बाजारात समभागांच्या सूचिबद्धतेसाठी कंपन्यांची लगबग आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. या उत्साही वातावरणाचा लाभ घेण्यासाठी अनेक कंपन्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून निधी उभारू इच्छित असून, सोमवारी एकाच दिवसात बाजार नियामक ‘सेबी’कडे १३ कंपन्यांनी केलेला अर्ज हेच दर्शविते.
हेही वाचा >>> निर्मिती क्षेत्राची वाढ आठ महिन्यांच्या नीचांकी; सप्टेंबर महिन्यात पीएमआय निर्देशांक ५६.५ गुणांवर
विक्रम सोलार, आदित्य इन्फोटेक आणि वरिंदर कन्स्ट्रक्शन्ससह डझनभराहून अधिक कंपन्यांसह भांडवली बाजारात येत्या काळात ‘आयपीओं’ची लाट येऊ घातली आहे. सोमवारी १३ कंपन्यांनी मसुदा प्रस्ताव (डीआरएचपी) सादर केला असून, या कंपन्यांकडून एकत्रित ८,००० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला जाणार आहे. चालू वर्षात आतापर्यंत ६२ कंपन्यांनी त्यांचे समभाग मुख्य मंचावर सूचिबद्ध करून, ६४,००० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. संपूर्ण २०२३ वर्षात ५७ कंपन्यांनी उभारलेल्या २९,४३६ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण २९ टक्क्यांनी अधिक आहे.
हेही वाचा >>> मॅसी फर्ग्युसनच्या मालकी विवादावर ‘टॅफे’ला अंतरिम दिलासा
बाजार अजमावू पाहणाऱ्या नव्या कंपन्यांमध्ये, अजॅक्स इंजिनीअरिंग, राही इन्फ्राटेक, विक्रम इंजिनीअरिंग, मिडवेस्ट, विनी कॉर्पोरेशन, संभव स्टील ट्यूब्स, जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, ऑल टाइम प्लास्टिक, स्कोडा ट्यूब्स आणि देव ॲक्सिलरेटर यांचाही समावेश आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला आणि देशांतर्गत बाजाराला अडथळा आणणारी मोठी घटना घडत नाही तोपर्यंत ‘आयपीओ’ची मजबूत गती कायम राहण्याची आशा आहे. आगामी २०२५ मध्येही प्राथमिक बाजारातील व्यवहारांची संख्या आणि निधी उभारणी विक्रमी पातळीवर राहण्याची शक्यता इक्विरसचे व्यवस्थापकीय संचालक मुनीष अग्रवाल यांनी व्यक्त केली.