मुंबई : कुटुंबाच्या बचतीची पूंजी ही आता लक्षणीय रूपात भांडवली बाजारातील गुंतवणुकीकडे वळत आहे आणि बचतदार ते गुंतवणूकदार हे उत्स्फूर्त संक्रमण शेअर बाजाराबद्दलचा वाढता विश्वास आणि सर्व जोखीम समजून घेऊन पूर्ण सूज्ञतेने सुरू आहे, हा बदल स्वागतार्हच असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी येथे प्रतिपादन केले. तथापि या गतिमान बदलाकडे दुर्लक्ष करून पारंपरिक पोस्टाच्या योजना अथवा बँकांतील मुदत ठेवींनाच बचत म्हणणे आणि ती घटत आहे म्हणून कांगावा करणे हे विरोधी पक्षांच्या कुंठित मानसिकतेचेच द्योतक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> घाऊक महागाई एप्रिलमध्ये १.२६ टक्क्यांसह १३ महिन्यांच्या उच्चांकी

दलाल स्ट्रीटवरील मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीतील सभागृहात आयोजित ‘विकसित भारत – २०४७ सालातील भारताच्या वित्त बाजाराचा वेध’ या परिसंवादात अर्थमंत्री सीतारामन यांनी उपस्थित शेअर दलाल आणि गुंतवणूक व्यावसायिक समुदायाला आश्वस्त करताना, केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार पुन्हा स्थानापन्न होईल, असा विश्वासही व्यक्त केला. या समयी भाजपचे राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शायना एनसी व्यासपीठावर उपस्थित होत्या. बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी सुंदर रमण राममूर्ती यांनी अर्थमंत्र्यांचे स्वागत केले.

हेही वाचा >>> सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे 

देशातील मध्यमवर्गीयांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून त्यांच्या पैशाला वाढीची संधी दिसून येत आहे. याचेच प्रत्यंतर म्हणजे २०१३ साली जेमतेम २ कोटी असलेली डिमॅट खाती आदा १५.१० कोटींवर गेली आहेत. केवळ मागील एका वर्षात यात ३.६० कोटींची विक्रमी भर पडली आहे, असे सीतारामन यांनी आवर्जून नमूद केले. म्युच्युअल फंडातील मालमत्ताही १० वर्षात ६ लाख कोटी रुपयावरून ५७६ टक्क्यांनी वाढून ५४.१० लाख कोटी रुपयांवर गेली आहे. तब्बल ५८० कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओच्या माध्यमातून या काळात ३ लाख कोटी रुपये उभारले आहेत, असा त्यांनी कौतुकपर उल्लेख केला. दरमहा ‘एसआयपी’द्वारे म्यु्च्युअल फंडात गुंतवणुकीची मात्राही गेल्या सात वर्षांत साडेचार पटींनी वाढली आहे. सुस्थिर, जोशपूर्ण आणि सखोल वित्तीय बाजारपेठेमुळे हे शक्य बनले आणि बाजाराला गती आणि स्थिरता देण्यात पंतप्रधान मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व, स्थिर व मजबूत सरकार, आर्थिक धोरणात सातत्य आणि निरंतरता हे घटक महत्त्वपूर्ण ठरले असा त्यांनी उल्लेख केला.

करविषयक प्रश्न अनुत्तरितच!

या प्रसंगी उपस्थित गुंतवणूक व्यावसायिक, सनदी लेखापाल, शेअर दलाल यांच्याकडून अर्थमंत्र्यांना करांचे दर, करमुक्त उत्पन्नाची बदल न झालेली मर्यादा, रोखे उलाढाल कर, लाभांशावरील कर, भांडवली लाभ कराचे मुद्दे मांडण्यात आले आणि दिलासादायी उत्तराच्या अपेक्षेने अनेक प्रश्न विचारण्यात आले. तथापि अर्थमंत्र्यांनी त्यासंबंधाने कोणतीही ग्वाही देण्याचे टाळले. जुलैमधील नवीन सरकारचे अर्थमंत्री जो अर्थसंकल्प मांडतील, त्यात याची उत्तरे दिली जातील, असे त्या म्हणाल्या.

वायद्यांमधील गुंतवणुकीपासून सावधगिरी

फ्युचर्स आणि ऑप्शन्ससारख्या जोखीमयुक्त व्यवहारांत छोट्या व्यक्तिगत गुंतवणूकदारांची अनियंत्रित वाढ ही भविष्यात घरगुती बचतीला धोक्याची आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाला उद्ध्वस्त करणारी ठरू शकेल, असा इशारा अर्थमंत्री सीतारामन यांनी दिला. सावधगिरीचा उपाय म्हणून दोन्ही शेअर बाजारांनी ‘सेबी’च्या या संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करावे. घरगुती बचतीतील ताजा बदल परिवर्तनकारी आहे, पण या पूंजीचे रक्षणही व्हायला हवे, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fm nirmala sitharaman assessment of india progress in 10 years print eco news zws
Show comments