नवी दिल्ली : भारत आणि इतर देशांदरम्यान भारतीय चलनात म्हणजेच रुपयामध्ये व्यापाराला चालना देण्याच्या विविध मार्गावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या ५ डिसेंबरला बँक प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या सहा बँकांच्या प्रमुखांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धानंतर आणलेल्या रशियावरील निर्बंधांमुळे सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांना वेगळा विचार करणे भाग पडले आहे. त्या अंगाने पावले टाकत आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात-निर्यात व्यवहार भारतीय चलन अर्थात रुपयांत होतील, हे पाहण्यासाठी बँकांना स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची रिझव्र्ह बँकेने चालू वर्षांत जुलै महिन्यात परवानगी दिली होती. त्यासंदर्भाने त्यातील प्रगतीचा आढावादेखील घेतला जाणार आहे. या वेळी परराष्ट्र व्यवहार आणि वाणिज्य मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकारीदेखील बैठकीत सामील होणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि रिझव्र्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे प्रतिनिधीदेखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
रिझव्र्ह बँकेच्या या व्यवस्थेअंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांचा निपटारा भारतीय रुपयामध्ये पूर्ण करता येणार आहे. याअंतर्गत बँकांना ‘रुपी व्होस्ट्रो’ खाती उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत दोन भारतीय बँकांमध्ये सुमारे नऊ विशेष ‘रुपी व्होस्ट्रो’ खाती उघडण्यात आली आहेत. रशियातील सर्वात मोठय़ा बँक असलेल्या सबेरबँक आणि व्हीटीबी बँकेने ही खाती उघडली आहेत. युको बँकेची इराणमध्ये आधीच व्होस्ट्रो खाते-आधारित सुविधा कार्यान्वित केली आहे. ही प्रकिया अधिक लोकप्रिय करण्यासाठी रिझव्र्ह बँकेने भारतीय सरकारी सिक्युरिटीजमध्ये अतिरिक्त शिल्लक गुंतवण्याची परवानगीदेखील दिली आहे.
यंत्रणा नेमकी कसे करते?
कोणत्याही देशासोबत व्यापार-व्यवहारांच्या पूर्ततेसाठी, भारतातील बँकेकडून भागीदार व्यापारी देशाच्या बँकेत विशेष खाते उघडले जाते. या यंत्रणेद्वारे आयात करणाऱ्या भारतीय आयातदारांकडून भारतीय रुपयामध्ये व्यवहार पूर्ण करून आयातदाराकडून भागीदार देशाच्या विशेष व्होस्ट्रो खात्यात चलन जमा केले जाईल. तसेच वस्तू आणि सेवांची निर्यात करणाऱ्या भारतीय निर्यातदारांना, भागीदार देशाच्या विशेष व्होस्ट्रो खात्यातील शिल्लक रकमेतून निर्यातीची रक्कम रुपयामध्ये दिली जाईल.