पीटीआय, नवी दिल्ली
वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या फोर्स मोटर्स लिमिटेडने विद्यमान आर्थिक वर्षाच्या अखेरीस ट्रॅक्टर आणि त्यासंबंधित सर्व व्यवसायांतून बाहेर पडण्याची शुक्रवारी घोषणा केली.कंपनीने, त्यांच्या नवीन उत्पादन धोरणानुसार, मुख्यतः प्रीमियम श्रेणीतील आणि उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने आणि विशेष वाहनांची निर्मिती यासारख्या मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये प्रवासी आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत विद्यमान वर्ष २०२३-२४ च्या अखेरीपासून ट्रॅक्टरचे उत्पादन आणि व्यवहार आणि संबंधित व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ट्रॅक्टरच्या विक्रीचा एकूण महसूल १८२.५३ कोटी रुपये होता, जो त्याच आर्थिक वर्षातील कंपनीच्या एकूण महसुलाच्या केवळ ३.६६ टक्के आहे, असे फोर्स मोटर्सने सांगितले.