सरलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातील थेट परकीय गुंतवणूक १६ टक्क्यांनी घसरली असून, आधीच्या वर्षातील ८४.४ अब्ज डॉलरच्या तुलनेत विदेशातून गुंतवणुकीचा हा प्रवाह ७१ अब्ज डॉलरवर सीमित राहिला आहे. उल्लेखनीय म्हणजे मागील दशकभराच्या कालावधीत थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ पहिल्यांदाच घटला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मासिक सारपत्रिकेमधून (२२ मे २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या) देशाच्या अर्थवृद्धीबाबत चिंता केली जावी, अशी ही बाब पुढे आली आहे. थेट परकीय गुंतवणुकीत वर्षागणिक १६.३ टक्क्यांची घसरण झाली असल्याचे या सारपत्रिकेने स्पष्ट केले. या अगोदर १० वर्षांपूर्वी म्हणजे आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये थेट परकीय गुंतवणूक ६ टक्क्यांनी आकुंचन पावत ३४.२९ अब्ज डॉलरवर सीमित राहिली होती. तसेच २०२२-२३ मध्ये नक्त थेट परदेशी गुंतवणुकीतही (नेट एफडीआय) आधीच्या वर्षातील ३८.६ अब्ज डॉलरच्या तुलनेत जवळपास २७ टक्क्यांची घसरण होऊन २८ अब्ज डॉलर इतकी मर्यादित राहिल्याचे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते. या अगोदर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ८१.९७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक भारतात आकर्षित झाली होती. २०१९-२० च्या तुलनेत त्यात १० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती.
कोणत्या क्षेत्रांना फटका?
निर्मिती, संगणक सेवा आणि दळणवळण सेवांच्या एफडीआय प्रवाहात मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक घट नोंदवली आहे. मुख्यतः अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मॉरिशस या देशांमधून येणारी गुंतवणूक घटली आहे.
हेही वाचाः एलआयसीचा तिमाही नफा वाढून १३,१९१ कोटी झाल्यानंतर शेअर्समध्येही उसळी
कोणत्या क्षेत्रात आवक?
आर्थिक २०२२-२३ मध्ये अर्धसंवाहक उद्योगात (सेमीकंडक्टर) सर्वाधिक २६.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित झाली. केंद्र सरकारच्या अर्धसंवाहक पूरक व्यवसाय धोरणामुळे या क्षेत्राला फायदा झाला. अमेरिकेनंतर सर्वाधिक गुंतवणूक भारतात झाली. अमेरिकेत अर्धसंवाहक उद्योगात ३३.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली.
हेही वाचाः मोठी बातमी! युरोपच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदीला सुरुवात; जगभरात पडसाद उमटणार?
भांडवली बाजारात नक्त खरेदीदार
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफपीआय) एप्रिलमध्ये देशांतर्गत वित्तीय बाजारांमध्ये निव्वळ खरेदीदार राहिले. त्यांनी १.९ अब्ज डॉलर मूल्याचे समभाग खरेदी केले. तर रोखे श्रेणीमध्ये ०.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली.