मुंबई : आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक ३.५ टक्क्यांनी घसरली असून, आधीच्या वर्षातील ४६.०३ अब्ज डॉलरच्या तुलनेत ती ४४.४२ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे. मुख्यतः सेवा क्षेत्र, संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, दूरसंचार, वाहन निर्मिती आणि औषध निर्माण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह आटल्याचा हा एकंदर परिणाम असल्याचे केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> Stock Market Today Update : नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची ६१७ अंशांनी गाळण

तथापि जानेवारी ते मार्च २०२४ या अंतिम तिमाहीत दरम्यान विदेशी गुंतवणूक ३३.४ टक्क्यांनी वाढून १२.३८ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ९.२८ अब्ज डॉलर होती. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकही २०२२-२३ मधील ७१.३५ अब्ज डॉलरवरून कमी होत, मार्च २०२४ अखेर ७०.९५ अब्ज डॉलरपर्यंत घटली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ८४.८३ अब्ज डॉलरचा परकीय गुंतवणुकीचा ओघ आला होता. सरलेल्या आर्थिक वर्षात, मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, केमन बेटे, जर्मनी आणि सायप्रस या प्रमुख देशांमधून गुंतवणुकीचा प्रवाह कमी राहिला, तर नेदरलँड आणि जपानमधून तो वाढला आहे.

हेही वाचा >>> बँकांचे १३,९३० कोटी फसवणुकीत फस्त : रिझर्व्ह बँक

महाराष्ट्र आघाडीवर सरलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक १५.१ अब्ज डॉलर गुंतवणुकीची परदेशातून आवक झाल्याचेही उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले. हा ओघ २०२२-२३ मध्ये १४.८ अब्ज डॉलर राहिला होता. त्याचप्रमाणे, गुजरातमध्ये २०२२-२३ मध्ये ४.७ अब्ज डॉलरवरून तो वाढून २०२३-२४ मध्ये ७.३ अब्ज डॉलरवर पोहोचला. तमिळनाडू, तेलंगणा आणि झारखंडमध्येही वाढ नोंदवण्यात आली. मात्र २०२२-२३ ला १०.४२ अब्ज डॉलरवरून कर्नाटकातील परदेशातील भांडवलाचा ओघ ६.५७ अब्ज डॉलरपर्यंत घसरला.