मुंबई : देशाचा परकीय चलन साठा २० डिसेंबरअखेर संपलेल्या आठवड्यात ६४४.३९ अब्ज डॉलर असा सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर रोडावला आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात चलन गंगाजळीत घसरण झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.
सरलेल्या आठवड्यात चलन साठ्यामध्ये ८.५ अब्ज डॉलरची घसरण झाली. ही गत महिन्याभरातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण असून, ढासळता रुपया यामागे आहे. आधीच्या दोन आठवड्यांत गंगाजळी एकूण ५.२ अब्ज डॉलरने आटली आहे.
हेही वाच – बँकिंग फसवणुकीत आठपट वाढ, रिझर्व्ह बँकेचा अहवाल; चालू आर्थिक वर्षातील सहामाहीतील स्थिती
रुपयातील अनावश्यक अस्थिरता रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरण कायम असून ऑक्टोबरच्या मध्यापासून रुपयातील घसरण तीव्र झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेली चाल, परकीय निधीचे बहिर्गमन, अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिकूल व्यापार धोरणे आणि फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीमध्ये हात आखडता घेतल्याने रुपया खाली घसरला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमित हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण काही प्रमाणात रोखली गेली आहे.