वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशात परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफपीआय) मार्च ते जून या चार महिन्यांत १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर एफपीआय ओघामध्ये भारताने आघाडी घेतली असून, तैवान ६ अब्ज डॉलरच्या (साधारण ४९ हजार कोटी रुपये) गुंतवणुकीसह दुसऱ्या स्थानी असल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालाने गुरुवारी स्पष्ट केले.
भारतातील तिमाहीत परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेल्या गुंतवणुकीचा विचार करता ती जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तिप्पट अधिक आहे. जगभरातील अनेक भांडवली बाजारांमध्ये अस्थिरतेचे वारे असताना निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यातून हा गुंतवणुकीचा ओघ परावर्तित झालेला दिसून येत आहे, अशी माहिती आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक सचिन जैन यांनी दिली.
हेही वाचा >>>एसीसी, अंबुजा सिमेंटचे विलीनीकरण नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर यांचे स्पष्टीकरण
देशांतर्गत भांडवली बाजारांच्या चांगल्या कामगिरीमुळे एमएससीआय विकसनशील बाजारपेठ निर्देशांकात भारताची आगेकूच सुरू आहे. चीनची अर्थव्यवस्था संकटात असून, एमएससीआय निर्देशांकात तिचा वाटा ३० टक्के आहे. परंतु, कामगिरीच्या बाबतीत चीनची स्थिती फारशी समाधानकारक नाही. अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा ओघ भारतात वाढण्याची चिन्हे आहेत. याच वेळी प्रत्यक्ष गुंतवणूक आगामी तिमाहींमध्ये अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे, असे जैन यांनी सांगितले.
इक्विटी फंडांची विक्रमी कामगिरी
‘एनएसडीएल’च्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत म्युच्युअल फंडांचे इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडांमधील गुंतवणुकीचे मूल्य जून २०२३ मध्ये विक्रमी २५.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक आहे. इक्विटी योजनांमधील गुंतवणूक मागील दोन महिन्यांत घटली होती. मात्र जूनमध्ये पुन्हा त्यात ओघ वाढला आहे. जून २०२३ मध्ये ५,६०० कोटी रुपयांची आवक झाली होती. तर मार्च २०२३ मध्ये १६,६९३ कोटी रुपये आवक होती, जी एप्रिल २०२३ मध्ये कमी होऊन ४,८६८ कोटी रुपये आणि मे २०२३ मध्ये ती ३,०६६ कोटी रुपयांपर्यंत खाली आली होती.
हेही वाचा >>>इन्फोसिसला ५,९४५ कोटींचा तिमाही नफा
मागील ३ ते ४ महिन्यांत भारतीय भांडवली बाजारांमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. बाजाराच्या निर्देशांकांनी उच्चांकीपातळी गाठली आहे. आगामी काळातील चित्र सकारात्मक असल्याने गुंतवणूकदारांनी नफावसुली टाळावी.- सचिन जैन, विश्लेषक, आयसीआयसीआय सिक्युरिटीज