मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोखेसंलग्न गुंतवणूक साधनांमध्ये केलेली गुंतवणूक सरलेल्या २०२३ मध्ये तीन वर्षांनंतर वाढ दर्शवणारी राहिली. आकर्षक परताव्यामुळे आणि जेपी मॉर्गनच्या निर्देशांकात भारतीय रोख्यांच्या समावेशामुळे हा सकारात्मक बदल तीन वर्षांनंतर घडून आला आहे.
हेही वाचा >>> व्होडा-आयडियाकडून ‘स्टारलिंक’शी वाटाघाटींचा इन्कार; समभागात साडेपाच टक्क्यांची घसरण
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये रोखेसंलग्न साधनांमध्ये एकूण ६८,६६३ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक झाली. तर वर्ष २०२२ मध्ये गुंतवणूकदारांनी त्यातून १५,९११ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला होता. याआधी वर्ष २०१९ मध्ये रोखेसंलग्न गुंतवणूक साधनांमध्ये २५,८८२ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक झाली होती.
हेही वाचा >>> बिटकॉइनचे मूल्य ४५,००० डॉलरपल्ल्याड; ‘ईटीएफ’ना मंजुरीच्या आशेने दोन वर्षांतील उच्चांकी झेप
वर्ष २०२३ मधील कर्जरोख्यांमधील गुंतवणूक ही वर्ष २०१७ नंतरची सर्वाधिक राहिली आहे. वर्ष २०१७ मध्ये त्यात १.४९ लाख कोटी रुपयांचा प्रवाह राहिला होता. जागतिक स्तरावर, मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरकपातीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. परिणामी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील रोखे उत्पन्न गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक असेल. तसेच जेपी मॉर्गन निर्देशांकातील समावेश हा परदेशी गुंतवणूकदारांच्या रोखे साधनांमधील प्रवाहास प्रामुख्याने चालना देणारा ठरला आहे, असे मत जेएम फायनान्शियलचे व्यवस्थापकीय संचालक आणि गुंतवणूक प्रमुख अजय मंगलुनिया यांनी व्यक्त केले.