मुंबई : अमेरिकेने भारतासह बहुतेक देशांवर लादलेल्या अतिरिक्त व्यापारशुल्कामुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. तूर्तास अमेरिकी प्रशासनाने निर्यात वस्तूंवर अतिरिक्त कर आकारणीस विराम दिला असला तरी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर प्रतिकूल परिणाम होणार आहेत. परिणामी,

विद्यमान एप्रिल महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) देशांतर्गत भांडवली बाजारातून ३१,५७५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत एफपीआयने एकूण १.४८ लाख कोटी रुपयांच्या निधीचे बहिर्गमन केले आहे.

फेब्रुवारीमध्ये, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३४,५७४ कोटी रुपये काढले, तर जानेवारीमध्ये ही रक्कम ७८,०२७ कोटी रुपयांहून अधिक होती. अमेरिकी व्यापार शुल्क धोरणांमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे. यामुळे जागतिक भांडवली बाजारांमध्ये कमालीची अस्थिरता आहे. आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान भारतीय शेअर बाजारांमधून एफपीआयने ३१,५७५ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या व्यापार शुल्कामुळे जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणाचा भारतातील एफपीआय गुंतवणुकीवरही परिणाम होत आहे. सध्याची अस्थिरता कमी झाल्यानंतर देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदार परतण्याची शक्यता आहे. मात्र मध्यम कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात निधी ओतला जाण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक युद्धामुळे जग मंदीकडे वाटचाल करत आहे. या प्रतिकूल जागतिक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६ टक्के दराने मार्गक्रमण करण्याची आशा आहे. यामुळे भारतीय भांडवली बाजार परदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनेल, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार म्हणाले.