मुंबई: बजाज ऑटोचे बिगर कार्यकारी संचालक मधुर बजाज यांचे वयाच्या ७३  व्या वर्षी शुक्रवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बजाज समूहातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या बजाज फिनसर्व्ह लिमिटेड, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि समूहातील इतर अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून मधुर बजाज काम करत होते. आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये बजाज ऑटोच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. ते देहरादून येथील डून स्कूलचे माजी विद्यार्थी होते. १९७३ मध्ये मुंबईतील सिडेनहॅम महाविद्यालयातून बी.कॉम. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १९७९ मध्ये स्वित्झर्लंडमधील लॉसान येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (आयएमडी) येथून ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. त्यांना इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाकडून ‘विकासरत्न’ पुरस्कार मिळाला होता.

उद्योग क्षेत्रातील सक्रियता आणि पुढारपणासाठी मधुर बजाज प्रसिद्ध होते. वाहन निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना- सियाम तसेच भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) पश्चिम विभागाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे, तसेच या संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणूनदेखील कार्यरत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए), मराठवाडा चेंबरचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष असताना मधुर बजाज यांनी दूरदृष्टीतून पावले उचलली होती. त्यांनी युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनसोबत परस्पर सामंजस्य करार केला होता. त्यामुळे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची (एमएसएमई) वाटचाल जागतिक दर्जाच्या मानकानुसार होण्यास मदत झाली आणि स्वयंउद्योजकता, नावीन्याला प्रोत्साहन मिळाले.- संजय किर्लोस्कर, अध्यक्ष, एमसीसीआयए

बजाज कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि आमचे कौटुंबिक मित्र मधुर बजाज यांच्या जाण्याने अतीव दु:ख झाले आहे. सीआयआय, एमसीसीआयए यांसारख्या संस्थांचे प्रमुख पद त्यांनी भूषविले होते. त्यांनी कायम व्यवसायातील उत्कृष्टतेला प्राधान्य दिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.- बाबा कल्याणी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज