गडचिरोली : प्रस्तावित सूरजागड इस्पात पोलाद प्रकल्पातून आठ दशलक्ष टन, तर लॉइड प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात ३० टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून होईल. त्यामुळे येथे उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून माओवादामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे जात असल्याचे चित्र पाहावयास मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

सूरजागड इस्पात पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वडलापेठ, अहेरी येथे बुधवारी करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉइड मेटलचे प्रमुख प्रभाकरन, सूरजागड इस्पात कंपनीचे प्रमुख सुनील जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ७,००० रोजगार तयार होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> विमानांच्या ताफ्यात पाच वर्षांत हजाराने भर! केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांची माहिती

फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगात ८० टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना लाभ होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. गडचिरोली जिल्ह्यातील जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोबतच आदिवासींचे दैवत असलेल्या ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चामोर्शीतसुद्धा ३५ हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून २० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘बीसीसीआय’च्या दिवाळखोरी दाव्याला आव्हान देण्याची ‘बैजूज’ची तयारी

गडचिरोली जिल्हा हा उद्योग-व्यवसायांच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाने मुंबईशी जोडण्यात येणार आहे. यासोबतच चार्मोशी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देईल. उद्योगमंत्री सामंत यांनी, दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे आजचे भूमिपूजन असल्याचे सांगितले. पुढील एक ते दोन महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख कोटींचे प्रकल्प येणार असल्याचे ते म्हणाले.

डॉ. आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करून क्रांती घडवून आणायची असल्याचे सांगितले. यावेळी कंपनीत नियुक्त १६ सुरक्षारक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय प्रकल्पातर्फे रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वितरित करण्यात आली.

Story img Loader