मुंबईः सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) कंपन्यांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ तसेच ‘बीएसई एसएमई’ या विशेषरचित बाजारमंचावर समभागांना सूचिबद्ध करण्यासाठी चार छोट्या कंपन्या चालू आठवड्यात गुंतवणूकदारांना आजमावत आहेत. या चार कंपन्यांकडून एकत्रितपणे १०६.४६ कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे केले जाणार आहेत.
एसजे लॉजिस्टिक्स
लॉजिस्टिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसजे लॉजिस्टिक्सची प्रारंभिक समभाग विक्री १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान सुरू असेल. कंपनीने प्रति समभाग १२१ रुपये ते १२५ रुपये या किमतीत सुमारे ४८ कोटी रुपये या माध्यमातून उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी सुरू असलेल्या या भागविक्रीचे व्यवस्थापन हेम सिक्युरिटीजकडून पाहिले जात आहे.
हेही वाचा >>> किरकोळ महागाईत पुन्हा वाढ; भडकलेल्या कांदा-टोमॅटोने नोव्हेंबरमधील दर ५.५५ टक्क्यांवर
प्रोजेक्ट कार्गो, ओडिसी कार्गो, वेअरहाऊसिंग आणि इतर सुविधांसह पुरवठा शृंखला क्षेत्रात कार्यरत एसजे लॉजिस्टिकचा आशियाई बाजारपेठांसह दक्षिण अमेरिका, युरोप, आखाती देशांच्या बाजारपेठेत विस्तार झालेला आहे. कंपनीचे १५० पेक्षा जास्त ग्राहक आहेत, त्यापैकी ४० टक्के ग्राहकांचा कंपनीसोबत अनेक वेळा व्यवसाय सुरू आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, कंपनीचा महसूल १३४.३१ कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा ७.६१ कोटी रुपये होता.
प्रेस्टोनिक इंजिनीअरिंग
महानगरांमधील मेट्रो रेल्वे जाळ्यासाठी आवश्यक रेल रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि अन्य सामग्रीचे सर्वांत मोठे उत्पादक प्रेस्टोनिक इंजिनीअरिंगची प्रारंभिक समभाग विक्रीचा बुधवार, १३ डिसेंबर अंतिम दिवस आहे.
‘एनएसई इमर्ज’ मंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या या भागविक्री प्रक्रियेचे व्यवस्थापन फिनशोअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीद्वारे पाहिले जात आहे.
प्रत्येकी ७२ रुपयांच्या किमतीसह समभागांची विक्री करून २३.३० कोटी रुपये उभे करणार आहे. प्रेस्टोनिक इंजिनीअरिंग या भागविक्रीद्वारे अतिरिक्त प्रकल्प स्थापण्यासह आणि यंत्रसामग्रीची खरेदी करण्यासाठी लागणारे भांडवल उभे करणार असून, कर्जाची आंशिक परतफेडही करणार आहे.
हेही वाचा >>> राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे संपत्ती किती? माहिती जाणून घ्या
सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज
स्वच्छतागृह आणि न्हाणीघराच्या नळांचे उत्पादन आणि पुनर्प्रक्रिया करणारी कंपनी सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीजची येत्या गुरुवारी, १४ डिसेंबरपासून प्रारंभिक समभाग विक्री खुली होत असून, ती १८ डिसेंबरला बंद होईल. प्रत्येकी ४३ रुपये ते ४६ रुपये किमतीला समभागांची विक्री करून कंपनी २२.९२ कोटी रुपये उभारणार आहे. ‘बीएसई एसएमई’ या बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या विक्री प्रक्रियेचे व्यवस्थापन हेम सिक्युरिटीजकडून पाहिले जात आहे.
गुजरातमधील जामनगरमध्ये कंपनीच्या तीन उत्पादन सुविधा असून, तिची उत्पादने भारतात मागणी असण्यासह, ती चीन, जर्मनी, बेल्जियम आणि ओमानलाही निर्यात होतात. कंपनीचा ३२ टक्के महसूल निर्यातीतून येतो. आर्थिक वर्ष २०२१ आणि २०२३ या दरम्यान कंपनीचा महसूल वार्षिक सरासरी ८८.५२ टक्के दराने वाढला आहे. या कालावधीत निव्वळ नफ्यात वार्षिक सरासरी १३१.९१ टक्के दराने म्हणजेच चौपट वाढ झाली आहे.
बेंचमार्क कॉम्प्युटर
पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअर प्रणाली सेवांसह आणि सॉफ्टवेअर विकसन तसेच सल्लागार सेवा देणारी मुंबईस्थित कॉम्प्युटर सोल्युशन्स लिमिटेड १४ ते १८ डिसेंबर दरम्यान प्रारंभिक समभाग विक्री करीत आहे. प्रत्येकी ६६ रुपये किमतीला समभागांची विक्री करून कंपनीचा १२.२४ कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. ‘बीएसई एसएमई’ मंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या या भागविक्रीचे व्यवस्थापन बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स ही कंपनी करत आहे. भागविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून, खेळते भांडवल आणि भांडवली खर्चासाठी अनुक्रमे ३.८० कोटी आणि ३.९० कोटी रुपये राखले जातील. धनंजय वाकोडे आणि हेमंत सनील या प्रवर्तकांनी संयुक्तपणे स्थापित या कंपनीचा महसूल आणि निव्वळ नफा हा आर्थिक वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे १८.६४ कोटी व ८३ लाख रुपये तसेच ३१.९५ कोटी रुपये आणि २.०३ कोटी रुपये असा वाढला आहे.