वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तैवानमधील फॉक्सकॉन कंपनी भारतात सुमारे १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहे. स्मार्टफोन डिस्प्ले मोड्यूल जुळणी प्रकल्प तमिळनाडूमध्ये उभारण्यासाठी ही गुंतवणूक केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
फॉक्सकॉनचा भारतातील हा प्रकल्प ॲपलच्या आयफोनला डोळ्यासमोर ठेवून उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून आयफोनसाठी डिस्प्ले मोड्यूलचा पुरवठा केला जाईल. या प्रकल्पात डिस्प्ले मोड्यूलची निर्मिती होणार नसून, त्यांची केवळ जुळणी होणार आहे. याचबरोबर फॉक्सकॉन कंपनी देशात गुगल पिक्सेल फोनची जुळणी करण्याची योजनाही आखत आहे. भारतात स्मार्टफोन व्यवसायात विस्तार करण्याचे पाऊल कंपनीने उचलले आहे. याचबरोबर देशातील आयसीटी, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रातही फॉक्सकॉन आपले स्थान निर्माण करीत आहे.
हेही वाचा >>>सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
फॉक्सकॉन या प्रकल्पाच्या माध्यमातून देशात इलेक्ट्रॉनिक जुळणी क्षेत्रात आणि निर्मिती पुरवठा साखळीमध्ये आपले स्थान उंचावणार आहे. पेगाट्रॉन अथवा टाटा इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या कंपन्या चीनमधून जुळणी झालेले मोड्यूल आयात करतात. फॉक्सकॉन या कंपन्यांना पुरवठा करेल. सध्या देशातील कंपन्या डिस्प्लेसाठी चीनवर ६० ते ते ६५ टक्के आणि दक्षिण कोरियावर २० ते २५ टक्के अवलंबून आहेत. देशात डिस्प्ले जुळणी प्रकल्प सुरू झाल्यास चीनमधून होणारी आयात कमी होण्यास मदत होणार आहे.
चेन्नईतील जागेची निवड
फॉक्सकॉनने चेन्नईमध्ये ५ लाख चौरस फूट जागेची निवड केली आहे. कंपनीच्या स्मार्टफोन जुळणी प्रकल्पाशेजारीच ही जागा आहे. ईएसआर ओरागाडम इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक पार्कमध्ये ही जागा आहे.