बंगळुरू : तंत्रज्ञान क्षेत्रातील फॉक्सकॉन कंपनी कर्नाटकमध्ये गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या इरादापत्रावर कर्नाटक सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि फॉक्सकॉन यांच्यात चेन्नईमध्ये नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली आहे. फॉक्सकॉनकडून ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
हेही वाचा >>> फिच’च्या कृतीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांना धडकी; सेन्सेक्सची ६७६ अंशांची गटांगळी
फॉक्सकॉनकडून राज्यात दोन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. अॅपलच्या आयफोनची जोडणी करण्याचे काम कंपनीकडून करण्यात येते. या गुंतवणुकीच्या इरादापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी कर्नाटकचे पायाभूत विकास मंत्री एम.बी.पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि फॉक्सकॉनचे अध्यक्ष योंग लिऊ उपस्थित होते.
कर्नाटकातील आयफोन जोडणीच्या पहिल्या प्रकल्पात फॉक्सकॉन उपकंपनीच्या माध्यमातून ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून १२ हजार रोजगार निर्माण होतील. अप्लाईड मटेरिअल्सच्या भागीदारीतून सेमिकॉन उपकरणांचा दुसरा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यात २ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यातून १ हजार रोजगार निर्माण होतील.
हेही वाचा >>> गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा-सेबी फंडातून पैसे देण्यास सुरुवात, अशी मिळवा तुमच्या हक्काची रक्कम?
कर्नाटकातील वातावरण व्यवसायपूरक असून, तिथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे उच्चतंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ते आकर्षक ठिकाण बनले आहे. राज्यात यशस्वीपणे व्यवसाय करण्याबाबत आम्ही आशादायी आहोत. – योंग लिऊ, अध्यक्ष, फॉक्सकॉन