नवी दिल्ली : एमडीएच आणि एव्हरेस्ट या कंपन्यांच्या चार मसाला उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड या कीटकनाशकाचे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्याने त्यावर हाँगकाँग आणि सिंगापूरने बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) देशात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या तपासणीचे पाऊल टाकले आहे, तर भारतीय मसाला मंडळाने या बंदीच्या निर्णयाची तपासणी सुरू केली असल्याचे सोमवारी जाहीर केले.
हाँगकाँमधील अन्न सुरक्षा नियामकांनी ही मसाला उत्पादने ग्राहकांनी खरेदी करू नयेत आणि व्यापाऱ्यांनी त्यांची विक्री करू नये, असे म्हटले आहे. याचवेळी सिंगापूरमधील अन्न नियामकांनी ही उत्पादने बाजारातून काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय मसाला मंडळाचे संचालक ए. बी. रेमा म्हणाले की, आम्ही या प्रकरणी लक्ष घातले आहे. या बंदीच्या निर्णयाची तपासणी आमच्याकडून सुरू आहे.
हेही वाचा >>> म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन
एमडीएच मद्रास करी पावडर, एव्हरेस्ट फिश करी मसाला, एमडीएच सांबार मिक्स्ड मसाला पावडर, एमडीएच करी मिक्स्ड मसाला पावडर या चार उत्पादनांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपनीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
देशात विकल्या जाणाऱ्या मसाल्यांची गुणवत्ता तपासणार!
अन्न सुरक्षा नियामक ‘एफएसएसएआय’ने देशभरातील एमडीएच आणि एव्हरेस्टसह सर्व नाममुद्रांच्या पूड रूपातील मसाल्यांचे नमुने घेणे सुरू केले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) निर्यात केलेल्या मसाल्यांच्या गुणवत्तेचे नियमन करत नाही. तथापि सिंगापूर आणि हाँगकाँगने गुणवत्तेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेतून, भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मसाला पूड उत्पादने आवश्यक मानदंडांची पूर्तता करतात की नाही हे तपासण्यासाठी पाऊल टाकले गेल्याचे सरकारी स्रोताने स्पष्ट केले.
इथिलीन ऑक्साईडचे दुष्परिणाम
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईड हे कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते असे म्हटले आहे. हाँगकाँगमध्ये कीटकनाशकांचा मर्यादेपेक्षा जास्त अंश असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केल्यास ५० हजार डॉलर दंड आणि सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.