– पीटीआय, नवी दिल्ली
देशाचा प्राथमिक बाजार जागतिक पातळीवर वेगाने पुढे सरसावत असून, पुढील कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांची निधी उभारणी कंपन्यांकडून केली जाईल, असा पँटोमथ समूहाचा विश्लेषणात्मक अंदाज आहे.
देशात २०२४ मध्ये प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ७६ कंपन्यांनी १.३० लाख कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. पुढील वर्षात हे प्रमाण विक्रमी २ लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. म्हणजे अमेरिकेच्या प्राथमिक बाजाराच्या दुप्पट, तर युरोपीय देशांच्या तुलनेत अडीच पट निधी उभारणी भारतात होऊ घातली आहे. भारतीय भांडवली बाजाराने प्रथमच ‘आयपीओ’ आणणाऱ्या कंपन्यांच्या संख्येच्या बाबतीत जागतिक अव्वल स्थान प्राप्त करून ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
अमेरिकी भांडवली बाजारातील कंपन्यांपेक्षा भारतात अधिक संख्येने नवीन कंपन्या बाजारात सूचिबद्ध होत आहेत. तर चीनमधील निधी उभारणीसंबंधी कठोर नियमांमुळे एका दशकातील सर्वाधिक कमी कंपन्या तेथे यंदा सूचिबद्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञान, माध्यम आणि दूरसंचार, औद्योगिक आणि ग्राहक क्षेत्राशी निगडित कंपन्यांनी सर्वाधिक ‘आयपीओ’ सरत्या वर्षात बाजारात आणले, एकत्रितपणे एकूण ‘आयपीओं’पैकी त्यांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक आहे.
हेही वाचा – अर्थमंत्रालयाचाही ६.५ टक्के विकासदराचा अंदाज
जागतिक अव्वल स्थान…
देशात मुख्य बाजार मंचावर २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत एकूण ३३२ कंपन्यांनी नशीब अजमावले. त्यापाठोपाठ अमेरिकी भांडवली बाजारात २०५, चीनमध्ये १३०, युरोपीय देश ६४ आणि जपानमध्ये ८० नवीन कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्या आहेत. मात्र ‘आयपीओ’च्या माध्यमातून सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी असली तरीही अमेरिकी कंपन्यांनी केलेली निधी उभारणी ३५.६ अब्ज डॉलर अशी प्रचंड आहे. तर भारतीय भांडवली बाजारातून कंपन्यांनी २२.७ अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. तर चीन आणि जपानमधील कंपन्यांनी तेथील बाजारातून अनुक्रमे १७ अब्ज डॉलर आणि २.३ अब्ज डॉलरची निधी उभारणी केली आहे.