टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या भावाने हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर आणखी कमी होणार आहेत. यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. यानंतर आता लोकांना स्वस्तात टोमॅटो खरेदी करता येणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED) यांना २० जुलै २०२३ पासून टोमॅटोला ७० रुपये प्रति किलो या किरकोळ दराने विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. NCCF आणि NAFED द्वारे खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला ९० रुपये प्रति किलो दराने विकले गेले होते आणि नंतर हे दर १६ जुलै २०२३ पासून ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत कमी केले गेले. हे दर ७० रुपये किलोपर्यंत कमी केल्याने ग्राहकांना आणखी फायदा होईल.
हेही वाचाः RBI ने आता ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द; ग्राहकांना फक्त ५ लाख रुपये काढता येणार
लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या संस्था नाफेड आणि एनसीसीएफ देशातील काही शहरांमध्ये स्वस्त दरात टोमॅटो विकत आहेत. बुधवारी सकाळी ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने टोमॅटो उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ठिकाणांची यादी जाहीर केली. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये अनेक ठिकाणी टोमॅटो स्वस्त दरात खरेदी करता येतात, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचाः सेन्सेक्स ६७ हजारांवर असूनही २०२२ च्या तुलनेत फायदा मूल्य कमीच?
ग्राहक व्यवहार विभागाच्या निर्देशानुसार, NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून टोमॅटोची खरेदी एकाच वेळी अशा मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये विकण्यासाठी सुरू केली होती, जिथे किरकोळ दर गेल्या एका महिन्यात सर्वाधिक वाढले होते. दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री १४ जुलै २०२३ पासून सुरू झाली होती. १८ जुलै २०२३ पर्यंत दोन्ही एजन्सींद्वारे एकूण ३९१ मेट्रिक टन टोमॅटोची खरेदी करण्यात आली होती, जी दिल्ली-एनसीआर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये ग्राहकांना सतत विकले जात आहेत.