गदर २ सिनेमामुळे सनी देओलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण ‘गदर २’ चित्रपट थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांत मोठी कमाई केली आहे की, तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. ९० च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असलेल्या सनीला मधल्या दोन दशकांमध्ये खूप संघर्ष करावा लागला आणि त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता अखेर ‘गदर २’ ने त्याला ते भव्य यश दाखवून दिले आहे, ज्याची तो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. पण एकीकडे सनीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत असताना दुसरीकडे खऱ्या आयुष्यात त्याच्या एका मोठ्या प्रॉपर्टीचा लिलाव होण्याची भीती आहे. सनीवर बँकेचे मोठे कर्ज होते, ज्याच्या वसुलीसाठी बँकेने आता त्याच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे.

काय प्रकरण आहे?

बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात दिली आहे. सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेला ‘सनी व्हिला’ नावाचा आपला व्हिला गहाण ठेवला. त्याऐवजी त्यांना जवळपास ५६ कोटी रुपये बँकेत भरायचे होते, जे अद्याप भरलेले नाहीत. हे कर्ज आणि त्यावर आकारले जाणारे व्याज वसूल करण्यासाठी बँकेने या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या जाहिरातीत म्हटले आहे की ‘सनी व्हिला’चा लिलाव २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी मालमत्तेची आरक्षित किंमत ५१.४३ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

सनी देओलची बॉक्स ऑफिसवर जादू

सनीच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ‘गदर २’ मधून तो पुन्हा थिएटरमध्ये परतला आहे. बॉक्स ऑफिसवर तुफानी वेगाने कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या ८ दिवसांत ३०० कोटींचा आकडा पार केला होता. शनिवारच्या कलेक्शननंतर चित्रपटाच्या कमाईने ९ दिवसांत ३३५ कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच ‘गदर २’ सनीच्या खात्यात ४०० कोटी कमावणारा चित्रपट म्हणून नोंद होणार आहे. ‘गदर २’ची ज्या पद्धतीने कमाई होत आहे, ते पाहता तो बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ‘पठाण’ चित्रपटाला टक्कर देऊ शकतो, असे मानले जात आहे. सनीने २००१ मध्ये साकारलेल्या ‘गदर’ चित्रपटातील तारा सिंगची भूमिका मोठ्या पडद्यावर एवढी लोकप्रिय आहे की, सिक्वेलमध्येही लोक त्याला भरभरून प्रेम देत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 star sunny deol bungalow in mumbai will be auctioned now the bank will recover 56 crores vrd