एकेकाळी भारतात माहीतसुद्धा नसलेल्या आणि रत्नागिरीच्या बाजारपेठेत टाकाऊ असलेल्या माशांच्या अर्थात ‘सुरिमी’ उत्पादनाला येथील गद्रे मरिन एक्स्पोर्ट लिमिटेड या कंपनीने १९९४ मध्ये सुरुवात केली आणि गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत सुमारे ४५ हजार टनांचा टप्पा गाठला आहे. गद्रे हे आज भारतातील सुरिमीचे प्रमुख उत्पादक आणि जगातील तिसरे मोठे निर्यातदार आहेत. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे दोन तृतीयांशपेक्षा जास्त सुरिमीची निर्यात केली जाते, तर उरलेली कंपनीच्या खाद्य पदार्थांसाठी वापरली जाते. सुरिमी उत्पादनाची ३० वर्षं पूर्ण केल्याबद्दल कंपनीतर्फे रत्नागिरीत पुरवठादार आणि हितचिंतकांचा अनौपचारिक मेळावा नुकताच साजरा झाला.
या तीन दशकांपूर्वी पंधरा-वीस वर्षे मोठ्या संघर्षाची होती. १९७३-७४ मध्ये गद्रे यांनी रत्नागिरीत कोळंबीवर शीतप्रक्रिया करून टाटा मिलला विकण्याचा धंदा सुरू केला. सुरुवातीला त्यामध्ये चांगले पैसे मिळाले. गद्रे यांनी मिरकरवाडा परिसरात असलेल्या त्यांच्या स्वतःच्या जागेत १९७८ मध्ये कारखाना सुरू केला. पण थोड्याच काळात कोळंबीचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांकडून व्यापारी डावपेच सुरू झाले. त्यामुळे उद्योग घाट्यात जाऊ लागला. या पार्श्वभूमीवर नवीन पर्यायाबाबत माहिती घेण्याचे प्रयत्न गद्रे यांनी सुरू केले. परदेशातही ते संपर्क ठेवून होते. एकदा हाँगकाँगच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात फिरत असताना तेथील लोक ‘रिबन’ मासा शीतप्रक्रिया करून चीनला पाठवत असल्याचे त्यांनी पाहिले. रत्नागिरीच्या समुद्रात हा मासा विपुल प्रमाणात उपलब्ध होता. शिवाय, फारशी मागणी नसल्याने दरही कमी होता. गद्रे यांनी त्यावर शीतप्रक्रिया करून विकण्याचा उद्योग १९९० मध्ये सुरू केला. इथेच त्यांच्या औद्योगिक वाटचालीला कलाटणी मिळाली. कारण या माशासाठी स्पर्धाच नव्हती.
हेही वाचा : Gold-Silver Price: सोने घसरणीनंतर किमतींमध्ये झाले मोठे बदल, पाहा मुंबई-पुण्यात काय सुरुये १० ग्रॅमचा भाव
याच सुमारास दक्षिण कोरियातून ‘सुरिमी’साठी मागणी आली. या उत्पादनाचा त्यांना अनुभव नव्हता. पण या मागणीमुळे त्या विषयाला पुन्हा चालना मिळाली. कोरियातून मागणी आल्यावर तेथील कंपनीकडून त्यांनी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञही घेतले. रत्नागिरीतील कारखान्यात पुढील सहा-सात महिन्यांमध्ये यंत्रसामग्रीची जुळणी करून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. या निर्मिती प्रक्रियेत मासा पाण्यात घुसळून चरबी बाजूला काढली जाते आणि प्रोटीन एकत्र करून त्याचा पांढरा लगदा बनवला जातो. त्याचा वापर करून मूल्यवर्धित मत्स्य खाद्यपदार्थ तयार केले जातात.
हेही वाचा : बँकांच्या ठेवींमध्ये घट हे सांख्यिकी मिथक! स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन
मत्स्य व्यावसायिकांच्या दृष्टीने टाकाऊ असलेले मासे गद्रे यांनी विकत घेऊन दक्षिण कोरियातील कंपनीला हवी असलेली ‘सुरिमी’ पुरवण्याचा उद्योग रत्नागिरीत सुरू केला. १९९४ साली मार्च ते मे या अवघ्या तीन महिन्यांच्या काळात त्यांच्या कंपनीने सुमारे २०० टन सुरिमीची निर्यात केली. त्यानंतर सुरिमीबरोबरच प्रक्रियायुक्त मत्स्य खाद्यपदार्थ निर्मिती आणि विक्रीचाही उद्योग उभारला. त्या आर्थिक वर्षात एकूण ६८० टन सुरिमीची निर्यात झाली. त्यातून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यानंतर दरवर्षी हे प्रमाण वाढतच राहिले. १९९९-२००० पर्यंत ते वर्षाला सुमारे १५ हजार टनांवर गेले. २००७-०८ मध्ये रत्नागिरीतल्या मिरजोळे येथील औद्योगिक वसाहतीत सुरिमीबरोबरच क्रॅब स्टिकचेही (मत्स्य प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ) उत्पादन सुरू झाले. मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुरिमी आणि क्रॅब स्टिक मिळून एकूण सुमारे ६४ हजार टनांचा टप्पा गाठला असून एकूण उलाढाल १,४०० कोटी रुपयांवर गेली आहे. दरम्यानच्या काळात वेरावळ (गुजरात), मंगलोर (कर्नाटक) आणि बालासोर (ओरिसा) या तीन ठिकाणी सुरिमीचे उत्पादन चालू झाले असून रत्नागिरीत फक्त क्रॅब स्टिकचे उत्पादन केले जाते. आता गद्रे यांचे चिरंजीव अर्जुन गद्रे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा सांभाळत आहेत. ंहे सर्व उत्पादन करताना आवश्यक निकष काटेकोरपणे पाळण्याचे आणि दर्जाशी कोणतेही तडजोड न करण्याचे धोरण अवलंबल्याबद्दल ‘गद्रे मरिन’ला राष्ट्रीय पातळीवरील ‘जबाबदार निर्यातदार’ म्हणून खास पुरस्कारही देण्यात आला आहे.