कांद्याचे भाव अजूनही कमी झालेले नाहीत. आता लसणाच्या भावाने सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले आहे. देशातील बहुतांश भागातील किरकोळ बाजारात गेल्या ६ आठवड्यांत लसणाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे भावाने किलोमागे २५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे सरासरी घाऊक किंमत १३० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे, तर उत्तम दर्जाचा लसूण घाऊक बाजारात २२० ते २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. डिसेंबरमध्ये लसणाचे दर वाढण्याची शक्यता आहे. कमी पुरवठा हे त्याचे कारण आहे.
किमती आणखी वाढू शकतात
वेगवेगळ्या दर्जाच्या लसणाची किरकोळ किंमत १८० ते ३०० रुपये प्रति किलो आहे. तर घाऊक किमती १५० ते २६० रुपये प्रति किलोच्या दरम्यान दिसत आहेत. पुणे एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक विक्रेते विलास भुजबळ यांनी सांगितले की, दरवर्षी या काळात लसणाचे भाव वाढतात. ज्याचे कारण कमी पुरवठा आहे. पुरवठ्याच्या समस्येमुळे आगामी काळात लसणाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला, बाजाराने पहिल्यांदाच ७० हजारांची पातळी ओलांडली
कांदा निर्यातबंदीमुळे संताप
कांद्यावरील निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढली आहे. कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातल्याने आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार घातला असून, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भाव ३० टक्क्यांनी घसरले आहेत. नोव्हेंबरमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने केंद्र सरकारने ८ डिसेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. काही बाजारात सर्वाधिक भाव ४५ रुपये किलोच्या वर गेले होते. बांगलादेश आणि नेपाळला होणारी कांद्याची निर्यात हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे भावात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले.
नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले
निर्यातबंदीनंतर शुक्रवारी लासलगाव बाजारात कांद्याचे सरासरी घाऊक भाव २५ रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरले, जे निर्यातबंदीपूर्वी ३५ रुपये किलो होते. तर नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा बंद होत्या. रविवारी महाराष्ट्रातील इतर सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले, घाऊक व्यापारात किमान आणि कमाल भाव २५ रुपये प्रति किलो ते ४५ रुपये प्रति किलोदरम्यान आहेत.