Gautam Adani Latest News: देशातील अग्रणी उद्योगपती व सर्वात श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या काही नावांमध्ये समावेश असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदाणी यांनी ते अदाणी समूहाची सूत्र कधी व कशी त्यांच्या वारसांकडे सोपवणार आहेत, यासंबंधी मोठं भाष्य केलं आहे. यानुसार, कोणत्या वर्षी ही सूत्रहस्तांतरण प्रक्रिया पार पडेल, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गौतम अदाणी हे अदाणी समूहाचे अध्यक्ष आहेत. देशभरातील अनेक मोठ्या व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अदाणी समूहाचा व्यापक वावर आहे. मग ते बंदरांच्या नियोजन व व्यवस्थापनाचं क्षेत्र असो, बांधकामाचं क्षेत्र असो, इंधन निर्मितीचं क्षेत्र असो किंवा शस्त्रास्त्र व्यवसायाचं क्षेत्र असो. अदाणी उद्योग समूहाकडे देशभरातील अनेक राज्यांमधील व थेट केंद्र सरकारचेही अनेक प्रकल्प आहेत. एवढ्या मोठ्या उद्योग समूहामध्ये खांदेपालट होणार असल्यामुळे हा बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे.
हिंडेनबर्गमुळे वाद, नंतर डॅमेज कंट्रोल!
दोन महिन्यांपूर्वी गौतम अदाणींवर शेअर मार्केटमध्ये अदाणी समूहाच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी गैरव्यवहार केल्याचे आरोप हिंडेनबर्गनं केले होते. त्यावरून देशासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. भारतीय शेअर बाजारात अदाणी उद्योग समूहाचे शेअर्स पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागले होते. न्यूयॉर्कमधील शेअर मार्केटमध्येही याचे पडसाद उमटू लागले होते. या सगळ्या प्रकरणावर खुद्द गौतम अदाणींनी अनेकदा व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. या काळात अदाणी उद्योग समूहाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत अदाणी समूह डॅमेज कंट्रोल मोडवर असल्याचं दिसून येत आहे.
गौतम अदाणी कधी होणार निवृत्त?
गौतम अदाणींनी निवृत्तीसंदर्भातली योजना स्पष्ट केल्याचं ब्लूमबर्गच्या वृत्तात नमूद केलं आहे. त्यानुसार, २०३०मध्ये गौतम अदाणी अदाणी समूहाची सर्व सूत्रं त्यांच्या वारसांकडे सोपवणार आहेत. २०३० च्या सुरुवातीला या सर्व प्रक्रिया होतील, असंही ते म्हणाले. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही घोषणा केल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
गौतम अदाणी यांचे दोन मुलं आणि दोन पुतणे हे त्यांचे वारस आहेत. करण(३७) व जीत (२६) ही अदाणींची दोन मुलं आणि प्रणव (४५) व सागर (३०) हे अदाणींचे दोन पुतणे या चौघांकडे अदाणी समूहाचं हस्तांतरण केलं जाईल. पण ते नेमकं कसं होईल? याविषयी उत्सुकता आहे. अदाणी उद्योग समूह शेअर मार्केटच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा उद्योग समूह असल्यामुळे तिथे घडणाऱ्या या हस्तांतरणाच्या घडामोडींचे व्यापक पडसाद अर्थव्यवस्थेत उमटण्याची शक्यता आहे.
“कोणताही व्यवसाय प्रदीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्याचं पुढच्या पिढीकडे होणारं हस्तांतरण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते कसं व्हावं याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मी पुढच्या पिढीला दिलं आहे. कारण हे हस्तांतरण नैसर्गिक पद्धतीने, टप्प्याटप्प्याने आणि नियोजनपूर्वकच व्हायला हवं”, असं गौतम अदाणी यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. गौतम अदाणींनी त्यांच्या चौघा वारसांना यासंदर्भात विचारणा केली असता चौघांनी उद्योगाच्या वाटण्या न करता तो एकत्रच चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
“मला आनंद आहे की माझे चारही वारस प्रगती साध्य करण्यासाठी आग्रही आहेत. नव्या पिढीत ही बाब सापडणं हे दुर्मिळ आहे. पण त्यांना त्यांचं विश्व उभं करण्यासाठी एकत्र काम करावं लागेल”, असं गौतम अदाणी म्हणाले आहेत.