मुंबई: ताजे लाचखोरीचे प्रकरण उजेडात येण्याच्या दीड वर्षांपूर्वीच मार्च २०२३ मध्येच अमेरिकेचा गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात ‘एफबीआय’च्या विशेष पथकाने अब्जाधीश गौतम अदानी यांचे पुतणे सागर अदानी यांच्याशी अमेरिकेत झडतीच्या वॉरंटसह संपर्क साधला होता. त्यांची काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्यासमयी जप्त केली गेली. अमेरिकेत न्यायालयीन पंचापुढे (ग्रॅण्ड ज्युरी) जातीने उपस्थित राहण्याचा हुकूमनामा त्या वेळी त्यांना सुपूर्द केला गेला. त्यानंतर गौतम अदानी यांनी त्या वॉरंट आणि हुकूमनाम्याच्या प्रत्येक पानाची छायाचित्रे काढून ती स्वत:ला ईमेल केली होती, असे आता उघडकीस आले आहे.
मात्र त्याच आठवड्यात, ११ मार्चला अदानी समूहाने अब्जाधीश अध्यक्ष गौतम अदानी यांच्या विरुद्ध अमेरिकेत सुरू असलेल्या कोणत्याही तपासाबाबत माहिती नाही, असा दावा करणारे निवेदन प्रसिद्धीसाठी जारी केले होते. आता न्यू यॉर्कमधील न्यायालयांकडून थेट अदानी यांच्या अटकेचे वॉरंट जारी झाले आहे. मात्र त्यानंतरही सर्व आरोप निराधार असल्याचे म्हणत समूहाने ते फेटाळले आहेत. परंतु गेले वर्षभर या चौकशीसंबंधाने माध्यमांमध्ये पुढे आलेल्या वृत्तांनाही ‘वदंता’ म्हणत समूहाकडून ते फेटाळले गेले. प्रत्यक्षात अशी चौकशी सुरू असल्याचे प्रकटन समूहाने अथवा समूहातील कंपनीने केव्हाही केले नाही. या अपुऱ्या अथवा भ्रामक प्रकटनावर खरे तर भारतीय बाजार नियामकांकडूनही समूहाला कारणे दाखवा नोटीस बजावली जावी, असा मतप्रवाह आता पुढे येत आहे.
हेही वाचा : ‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी
अमेरिकेतील आरोपपत्रात, अदानी समूहाने अमेरिकी वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांची केवळ दिशाभूल केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात मागील वर्षभर भारतातील भांडवली बाजार आणि भागधारकांची ‘खोटी’ आणि ‘भ्रामक’ विधाने करून समूहाने फसवणूक केल्याचे उपलब्ध तपशिलावरून स्पष्ट होत आहे.