नवी दिल्ली : Gautam Adani beats Mukesh Ambani as richest Indian सुमारे ११.६ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांमुळे अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची मालमत्ता ९५ टक्क्यांनी वधारून ११.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. ज्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अंबानींना मागे सारत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे, असे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ‘हुरुन इंडिया रिच’ सूचीने स्पष्ट केले. या सूचीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती २०२४ मध्ये, २५ टक्क्यांनी वाढून १०.१४ लाख कोटी रुपये झाली आहे.

हेही वाचा >>> Share Market Today : सेन्सेक्स ८२ हजारांच्या पुढे ऐतिहासिक उच्चांकावर

हुरूनच्या २०२३ च्या अहवालात, अदानी यांची संपत्ती ५७ टक्क्यांनी घसरून ४.७४ लाख कोटी रुपये झाली होती, तर अंबानी ८.०८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पहिल्या स्थानी होते. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने लावलेल्या विविध आरोपांमुळे अदानींच्या संपत्तीमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २०१४ मध्ये गौतम अदानी यांची संपत्ती सुमारे ४४,००० कोटी रुपये इतकी होती, त्यावेळी ते देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दहाव्या स्थानी होते. एचसीएलचे शिव नाडर आणि कुटुंब ३.१४ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत, तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पूनावाला २०२४ मध्ये २.८९ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह चौथ्या स्थानी घसरले आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी यांनी या यादीत गेल्या वर्षी सहाव्या स्थानी होते, ते आता २.५० लाख कोटींच्या संपत्तीसह पाचव्या स्थानी पोहोचले आहेत.

Story img Loader