पीटीआय, नवी दिल्ली
विद्यमान आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाने बुधवारी त वर्तविला. नियमित रूपात आकडेवारीच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या ३६ उच्च वारंवारता निर्देशकांचा वापर करून केल्या गेलेल्या या अनुमानानुसार, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ अंदाजे ६.२ टक्के ते ६.३ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था स्थिरता प्रदान करत असून इतर क्षेत्रांनीही गती टिकवली आहे. किरकोळ महागाई दराने दिलासा दिल्याने, उद्योगधंद्यांकडून गुंतवणूक व उत्पादक कार्यावरील खर्चात वाढीची शक्यता आहे. परिणामी अर्थव्यवस्थेत देखील वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची आशा स्टेट बँकेच्या अहवालाने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भांडवली खर्चात सुधारणा निदर्शनास आली असल्याचे अहवालात म्हटले आहे. जागतिक भू-राजकीय घडामोडी आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे कॅलेंडर वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत मंदीचा परिणाम केवळ भारतावरच नाही तर इतर देशांवरही झाला. तरीही, स्टेट बँकेच्या संशोधन अहवालानुसार, भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) देशांतर्गत आघाडीवर वाढती मागणी आणि केंद्र सरकारच्या धोरणात्मक सुधारणांमुळे चालू आर्थिक वर्षात आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.