पीटीआय, नवी दिल्ली

अमेरिका आणि चीनमधून मागणी कमी झाल्यामुळे भारताची रत्ने व दागिन्यांची निर्यात फेब्रुवारीमध्ये २३.४९ टक्क्यांनी घसरून २१,०८५ कोटी रुपयांवर मर्यादित राहिली आहे, असे द जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) बुधवारी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ च्या याच कालावधीत रत्ने व दागिन्यांची एकूण निर्यात २६,२६८ कोटी रुपये नोंदवली गेली होती. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही निर्यात १३.४३ टक्क्यांनी घसरून २,१७,१४८ कोटी रुपये झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील २,४६,१०५ कोटी रुपये होती.

रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत घट ही मुख्यतः चीन तसेच अमेरिकेतील मागणीत सतत घट झाल्यामुळे आहे. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे अमेरिका, चीन आणि जी७ राष्ट्रांसह प्रमुख निर्यात बाजारपेठांमधील मागणीवर परिणाम झाला आहे. तसेच, कच्च्या हिऱ्याच्या किमतीत १०-१५ टक्क्यांनी घसरण झाल्याने निर्यातीत एकूण घट झाली आहे, असे जीजेईपीसी नवनिर्वाचित अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी सांगितले.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये ११,८६० कोटी रुपये मूल्याच्या हिऱ्यांची एकूण निर्यात झाली, जी २०.२ टक्क्यांनी घसरली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ही निर्यात १४,१६४.१ कोटी रुपये होती. सोन्याच्या दागिन्यांची एकूण निर्यात १८.०९ टक्क्यांनी कमी होऊन ६,५४९.४६ कोटी रुपयांवर मर्यादित राहिली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ७,६२४ कोटी रुपये मूल्याच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात करण्यात आली होती.

फेब्रुवारीमध्ये पॉलिश केलेल्या प्रयोगशाळेत निर्मिती (लॅब ग्रोन) हिऱ्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या १,१५५ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा १९.५८ टक्क्यांनी घसरून ९७५.२२ कोटी रुपये नोंदवली गेली.

Story img Loader