मुंबई: चार पिढ्यांचा वारसा असलेला, अग्रगण्य कृषी प्रक्रिया व दुग्ध व्यवसाय समूह – बी. जी. चितळे डेअरीज प्रा. लि.चे संचालक गिरीश चितळे यांची अग्रगण्य औद्योगिक संघटना असलेल्या भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’च्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर २०२५-२६ कालावधीसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य परिषदेच्या माध्यमातून ‘सीआयआय’द्वारे राज्यातील औद्योगिक वाढ, कृषी आणि ग्रामीण विकास, तसेच स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यावर भर दिला जातो. चितळे डेअरीने शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, समतोल पशुखाद्य, उत्तम वंशावळ उपलब्ध करून देणे, आरोग्य व्यवस्थापन व आधुनिक दुग्धशाळा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आणि दुधाच्या गुणवत्तेनुसार पारदर्शक दर देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

गिरीश चितळे हे व्यवस्थापन आणि विपणन क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेले उद्योजक आहेत. त्यांनी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, प्रक्रियांचे सुलभीकरण आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांचा विशेष भर कृषी आणि ग्रामीण भागातील उद्योजकता, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानावर आधारित विकासावर आहे. सीआयआय महाराष्ट्र परिषदेवर त्यांच्या निवडीमुळे कृषी आणि ग्रामीण उद्योजकता, कौशल्यविकास यांसाठी धोरणात्मक पुढाकार घेण्याची त्यांना संधी मिळणार आहे.

Story img Loader