नवी दिल्ली : रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ अर्थात देशभरात सर्वत्र सोन्याचे एकसमान दर लागू करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

देशात एकाच दराने सोने आयात केले जाते, मात्र देशांतर्गत किरकोळ किमती एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलतात. विविध महानगरांसह, शहरे, खेड्यांमधील विक्रेत्यांकडे सोन्याचे दर सध्या वेगवेगळे आहेत. ग्राहकांसाठी सर्वत्र एकसारखीच किंमत राहील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ‘जीजेसी’ने स्पष्ट केले. देशभरात एकच दर हवा आहे, असे जीजेसीचे सचिव मितेश धोर्डा यांनी ‘लकी लक्ष्मी’ या सुधारित वार्षिक उपक्रमाच्या अनावरणप्रसंगी सांगितले. २२ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत हा सुवर्ण महोत्सव सुरू राहणार आहे.

हेही वाचा >>> ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा

जीजेसी सदस्यांसोबत यापूर्वीच पन्नासहून अधिक बैठका या संबंधाने झाल्या असून या उपक्रमासाठी ८,००० सराफांना एकत्र आणण्यात या संघटनेने यश मिळवले आहे. सरकारला यासंबंधी निवेदन दिले जाणार असून ‘जीजेसी’च्या भागधारकांना याबाबत महत्त्व पटवून देण्यावर भर दिला जात आहे. जीजेसीच्या सदस्यांना व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट समूहाद्वारे शिफारस केलेले दर आधीच दिले जात आहेत. आमचे लक्ष्य टप्प्याटप्प्याने किमान ४ ते ५ लाख सराफांपर्यंत पोहोचण्याचे आहे, असेही धोर्डा म्हणाले. एकसमान दराची अंमलबजावणी विशेषतः गुजरातमध्ये आव्हानात्मक ठरेल, असे त्यांनी सूचित केले.