UPI Payment Failure: देशातील विविध भागांत यूपीआय सेवा ठप्प झाली होती. यामुळे लाखो नागरिकांना डिजिटल पेमेंट करण्यात अडचणी येत होत्या. यानंतर अनेक यूपीआय युजर्सन तक्रारी केल्या होत्या की, त्यांचे पेमेंट फेल होत आहेत किंवा खूप संथ गतीने होत आहेत. विविध बँकांच्या ग्राहकांना यूपीआय द्वारे पैसे पाठवण्यात आणि ते प्राप्त करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यूपीआय व्यवहारांशी संबंधित समस्यांबद्दल युजर्स सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारी आणि संताप व्यक्त केला होता. दरम्यान आता यूपीआय सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती एनसीपीआयने दिली आहे.

“एनपीसीआयला आजा काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे यूपीआय सेवा काही काळ ठप्प झाली होती. आता ही समस्या सोडवण्यात आली असून, सिस्टम स्थिर झाली आहे. गैरसोयीबद्दल खेद आहे”, असे एनपीसीआय ने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

यूपीआय सेवा ठप्प झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की, ग्राहकांना यूपीआय द्वारे पेमेंट करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे व्यवहारांवरही परिणाम झाला. ऑनलाइन शॉपिंग आणि अ‍ॅप्सवर पेमेंट फेल झाल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. काही युजर्सनी तक्रार केली होती की त्यांचे फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सारखे अ‍ॅप्स योग्यरित्या काम करत नव्हते.

कोणत्या अ‍ॅपच्या ग्राहकांना सर्वाधिक फटका?

आज यूपीआय पेमेंट फेल्युअरचा सर्वाधिक फटका गुगल पे च्या युजर्सना बसला आहे. गुगल पे च्या ७२ टक्के युजर्सनी याबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यानंतर वेबसाइट अ‍ॅक्सेस १४% टक्के आणि अ‍ॅप्सशी संबंधित समस्या १४ टक्के आहेत. त्याचप्रमाणे, पेटीएमवरील ८६ टक्के तक्रारी पेमेंटशी संबंधित होत्या. दरम्यान, लॉगिन आणि खरेदीशी संबंधित समस्यांचे प्रमाण अनुक्रमे ९ टक्के आणि ६ टक्के होते.

बँकिंग अ‍ॅप्सवरही परिणाम

दरम्यान या समस्येचा फटका बँकिंग सेवांनाही बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युजर्सना ट्रन्झॅक्शन्स (४७%), मोबाइल बँकिंग (३७%) आणि ऑनलाइन बँकिंग (१६%) मध्ये अडचणी आल्या. एकूणच, यूपीआय सिस्टीमवरील ८४% तक्रारी पेमेंट फेल होण्याशी संबंधित होत्या.

सोशल मीडियावर युजर्सचा संताप

डाउनडिटेक्टरच्या मते, यूपीआय सेवेशी संबंधित या समस्या दुपारी उशिरा सुरू झाल्या असून, संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तक्रारींमध्ये मोठी वाढ दिसून आली. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी पेमेंट फेल झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या.