मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागात खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक अर्ध्या टक्क्यानी वधारले. सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर मंगळवारी तेजीवाल्यांनी बाजारावर पुन्हा ताबा मिळविला. डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयानेही बाजाराच्या उत्साही वळणाला चालना दिली. दिवसअखेर सेन्सेक्स २७४.१२ अंशांची कमाई करत (०.४५ टक्के) ६१,४१८.९६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात, या निर्देशांकाने ६१,०७३.६८ अंशांच्या नीचांकाला, तर ६१,४६६.६३ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीमध्ये ८४.२५ अंशांची वाढ (०.४६ टक्के) झाली आणि तो १८,२४४.२० पातळीवर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिल्याने सलग तीन सत्रात घसरण झाली. मात्र मंगळवारच्या सत्रात जागतिक बाजारांमधील तेजीला प्रतिसाद देत बाजार वधारला. मात्र चीनमधील करोना साथीच्या पार्श्वभूमीवर अजूनही कडक निर्बंध कायम असल्याने नकारात्मता कायम असून त्याचा जागतिक आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत आहे. याचबरोबर फेडरल रिझव्‍‌र्हने आक्रमक व्याजदर वाढीचे धोरण कायम ठेवण्याचे सूतोवाच केल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा उत्साह ओसरल्याचेही दिसत आहे. परिणामी देशांतर्गत बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांचा ओढा कमी होण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.