वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्राथमिक बाजारात विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘आयपीओं’ना वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. मात्र केवळ देशांतर्गत भांडवली बाजारातच नव्हे तर परदेशात देखील कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (आयपीओ) निधी उभारणीच्या मोठ्या योजना आखल्या आहेत.
कॅलेंडर वर्ष २०२४ च्या पहिल्या आठ महिन्यांत ऑगस्टपर्यंत जागतिक स्तरावर ८२२ कंपन्यांनी ६५ अब्ज उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत ही वाढ १७.४ टक्क्यांनी अधिक आहे, जेव्हा याच कालावधीत १,५६४ कंपन्यांनी ५५.४ अब्ज डॉलरची निधी उभारणी केली होती, अशी माहिती लंडनस्थित विदा कंपनी ग्लोबलडेटा अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांनी निधी उभारणी केली असून गुंतवणूकदारांकडून कैकपटीने अधिक भरणा प्राप्त आहे. देशांतर्गत आघाडीवर मुख्य मंचासह एसएमई अर्थात सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक कंपन्या बाजारात नशीब आजमावण्यास उत्सुक आहेत. जागतिक पातळीवर २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये भांडवली बाजारांमध्ये सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी असूनही जागतिक पातळीवर गुंतवणूकदार मोठ्या, मौल्यवान कंपन्यांच्या आयपीओकडे वळत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा >>>Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती
गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत लक्षणीय बदल झाला आहे, ज्यामध्ये नवीन सूचिबद्ध कंपन्यांच्या आर्थिक स्थिरतेवर आणि नफाक्षमतेवर अधिक भर देण्यात आला आहे. कठोर आर्थिक परिस्थिती आणि सततच्या बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा बदल गुंतवणूकदारांकडून अधिक विवेकी दृष्टिकोनाचा संकेत देतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.आयपीओ बाजारावर चलनविषयक धोरणातील बदल, भू-राजकीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या पसंती विकसित होण्यासह अनेक जटिल घटकांचा प्रभाव राहिला आहे.
भारत अव्वल
आशिया-पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक ५७५ व्यवहार नोंदवले गेले, ज्या माध्यमातून २३.७ अब्ज डॉलरची निधी उभारणी झाली आहे. तर उत्तर अमेरिकेत २५.४ अब्ज मूल्याचे १४९ सौदे पार पडले. देशांतर्गत आघाडीवर भारतीय बाजारांमध्ये २०२४ च्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये २२७ व्यवहारांसह १२.२ अब्ज डॉलरची निधी उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये एसएमई श्रेणीतील कंपन्यांचा देखील मोठा वाटा आहे. विद्यमान वर्षात (२०२३-२४) मार्च अखेरपर्यंत १९० एसएमई कंपन्यांनी सुमारे ५,५७९ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. भारतीय भांडवली बाजारात विद्यमान वर्षात ह्युंदाई मोटर इंडिया, स्विगी, हेक्सावेअर टेक, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, टाटा प्लेमी विशाल मेगा मार्ट या कंपन्या सुमारे ६०,००० कोटी रुपयांची निधी उभारणी करणार आहेत.