मुंबई: जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात घसरणीच्या शक्यतेने सराफांकडून सोने विक्री करण्यात आली. त्या जोडीला केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात केल्याने स्थानिक घाऊक बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा ९२० रुपयांनी घसरून ६७,९५४ रुपयांवर गुरुवारी स्थिरावले .

सराफा संघाच्या म्हणण्यानुसार, मागील म्हणजे बुधवारच्या सत्रात स्टँडर्ड सोने प्रति तोळा ६८,८७५ रुपयांच्या पातळीवर स्थिरावले होते. मुंबईत चांदीचा घाऊक बाजारातील भाव किलोमागे ८१,४७५ रुपयांवर गुरुवारी स्थिरावला. बुधवारच्या तुलनेत त्यात तब्बल ३,३९० रुपयांनी घसरण झाली आहे. दिल्लीतही सलग तिसऱ्या दिवशी सोन्यात घसरण सुरू असून २४ कॅरेट आणि २२ कॅरेट शुद्ध सोने प्रत्येकी १,००० रुपयांनी घसरून अनुक्रमे ७०,६५० रुपये आणि ७०,३०० रुपये प्रति तोळा या दरापर्यंत खाली आले. २३ जुलै रोजी अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सलग तीन सत्रांत सोन्याचे दर प्रति तोळा ५,००० रुपयांनी घसरले आहेत. मौल्यवान धातूंमधील ही विद्यमान वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले आहे.