पीटीआय, नवी दिल्ली
सोन्याचे विक्रमी दर आणि त्यातील मोठ्या चढ-उतारांचा सरलेल्या जानेवारी-मार्च या तिमाहीत भारतीयांकडून होणारी सोन्याच्या मागणी १७ टक्क्यांनी घसरून ११२.५ टनांवर मर्यादित राखणारा परिणाम दिसून आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत मागणी १३५.५ टन नोंदवली गेली होती.
जागतिक अस्थिरता आणि जगभरातील गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याला प्राधान्य देण्यात आले. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारांत सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक प्रस्थापित केला. याचाच परिणाम किरकोळ गाहकांकडून होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवर दिसून आला. दरम्यान सोन्याच्या दागिन्यांची मागणी गेल्या वर्षातील याच तिमाहीतील (जानेवारी-मार्च २०२२) ९४.२ टनांच्या तुलनेत, यंदा ७८ टनांवर घसरली. २०१० पासून करोना महासाथीचा कालावधी वगळता, चौथ्यांदा सोने दागिन्यांची मागणी १०० टनांपेक्षा कमी झाली आहे, अशी माहिती ‘जागतिक सुवर्ण परिषदे’चे भारतातील मुख्याधिकारी पी. आर. सोमसुंदरम यांनी दिली.
‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मूल्याबाबत भारताची सोने मागणी सरलेल्या तिमाहीत १७ टक्क्यांनी घटून ५६,२२० कोटी रुपये झाली आहे. जानेवारी-मार्च २०२२ दरम्यान ती ६१,५४० कोटी रुपये होती. तर दागिन्यांच्या मागणीचे मूल्य ९ टक्क्यांनी घसरून ३९,००० कोटी रुपये होते, जे २०२२ च्या याच तिमाहीत ४२,८०० कोटी रुपये होते.
गुंतवणूक म्हणून मौल्यवान धातूला असलेली मागणी १७ टक्क्यांनी रोडावत गेल्या तिमाहीत ३४.४ टन राहिली आहे. जी गेल्यावर्षी ४१.३ टन होती. गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी मूल्याच्या प्रमाणात ८ टक्क्यांनी घसरून १७,२०० कोटी रुपये झाली. जानेवारी-मार्च २०२२ दरम्यान ती १८,७५० कोटी रुपये नोंदण्यात आली होती. सोन्याच्या पुनर्वापराचे प्रमाणही यंदा २५ टक्क्यांनी वाढून ३४.८ टनांपर्यंत गेले आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत २७.८ टन होता.
मागणी घटण्याची कारणेः
अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ, मजबूत डॉलर आणि रुपयातील घसरणीमुळे सोन्याच्या किमती वार्षिक तुलनेत १९ टक्क्यांनी वाढून, प्रतितोळा ६०,००० रुपयांवर राहिल्या.
किमतीतील तीव्र वाढीमुळे अनेक ग्राहकांनी सोने खरेदी टाळली. किमतीत पुढे घसरण होईल या अपेक्षेने अनेकांनी सोने खरेदीचा निर्णय पुढे ढकलला.
नवीन सोने खरेदी टाळून जुन्या सोन्याच्या दागिन्यांचा पुनर्वापराला ग्राहकांकडून प्राधान्य. याचबरोबर सोने खरेदीच्या डिजिटल गोल्ड मंचावरून मागणी वाढली आहे.