मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाची वाढती तीव्रता, चीनमधील करोनाची वाढती रुग्णसंख्या, अमेरिकेसह युरोपातील वाढती महागाई आणि त्यापरिणामी मध्यवर्ती बँकाकडून वाढणारे व्याजदर यांच्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांकडून सरलेल्या वर्षांत सोन्यातील गुंतवणुकीला अधिक पसंती राहिली. सध्याची एकंदर जागतिक परिस्थिती पाहता सोने २०२३ मध्ये दुहेरी परतावा देईल, असा विश्लेषकांचा होरा आहे.
वाढणाऱ्या जागतिक मागणीचे पडसाद सोन्याच्या दरावर उमटले आहेत. त्याच जोडीला डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत असल्याने भारतातदेखील सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे वर्ष २०२२च्या सुरुवातीस प्रति १० ग्रॅम ४९,९९० रुपयांवर असलेला सोन्याचा दर ५६ हजारांवर पोहोचला आहे. यातून गुंतवणूकदारांना सरलेल्या वर्षांत सोन्यातून वार्षिक १२ टक्के परतावा मिळाला आहे. चलन मूल्याची जोखीम लक्षात घेऊन जगातील काही मध्यवर्ती बँकांनी २०२२ मध्ये सोन्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली आहे. यात रशिया व चीन आघाडीवर असून, सोन्याची झालेली खरेदी ही १९६७ नंतरची सर्वात मोठी आणि वेगवान आहे, याची पुष्टी वल्र्ड गोल्ड कौन्सिलसह व विविध संस्थांनी केली आहे.
सोने तेजी कशाने?
सोन्याची एवढय़ा मोठय़ा स्वरूपात खरेदी होण्यामागे नक्कीच प्रमुख कारणे आहेत. यात अमेरिका व त्यांच्या सहकारी देशांनी रशियाची डॉलरमधील गंगाजळी गोठवली आहे. तसेच, युद्धामुळे आणि करोनासह भू-राजकीय अस्थिरतेमुळे मध्यवर्ती बँकांनी जोखीम कमी करण्यासाठी सोन्यालाच पसंती दिली आहे. या संस्थांकडून ६७३ टन सोन्याची खरेदी झाली असून, तिसऱ्या तिमाहीतील बँकांची खरेदी सुमारे ४०० टन आहे.
वर्ष २००० नंतर सोन्याची एका तिमाहीत झालेली ही सर्वात मोठी खरेदी आहे. मात्र रशिया व चीन यांच्यासह अन्य देशांकडून यापेक्षाही अधिकची सोन्याची खरेदी झाली असल्याची शक्यता वल्र्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केली आहे.
पीपल्स बँक ऑफ चायनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये १.८ अब्ज डॉलर मूल्याचे तब्बल ३२ टन सोने खरेदी केले आहे. २०१९ नंतर चीनने सोन्याच्या साठय़ात केलेली ही पहिली अधिकृत वाढ आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते यापेक्षा अधिक सोने चीनने खरेदी केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याचा अधिकृत साठा जाहीर करणे बंद केले आहे.
जागतिक प्रतिकूल परिस्थिती पाहता सोन्याच्या भावात २०२३ मध्ये तेजीचे संकेत आहेत. करोना महासाथीनंतर २०२० मधील भारतातील सोन्याच्या दराचा प्रति १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा उच्चांक मोडला जाण्याची अपेक्षा आहे. जागतिक पातळीवर सोने प्रति औंस १९२० ते २००० डॉलर पातळीवर जाऊ शकते. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोन्यात २०२३ मध्ये दुहेरी परतावा मिळू शकतो आणि प्रति १० ग्रॅम ६० ते ६२ हजार रुपयांवर दर जाऊ शकतो. एकूण वर्षांतील सरासरी ही ५६-५८ हजारांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
– अमित मोडक, कमॉडिटी तज्ज्ञ व पीएनजी सन्सचे संचालक