पीटीआय, नवी दिल्ली
देशातील सोन्याच्या आयातीत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ५ अब्ज डॉलरने घट झाल्याची बाब समोर आली आहे. आधीच्या प्राथमिक आडाख्यामध्ये सोन्याची आयातीचा आकडा फुगविण्यात आल्याचेही सरकारी आकडेवारीतून बुधवारी निदर्शनास आले.
सोन्याची आयात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १४.८ अब्ज डॉलर झाल्याचे सरकारने आधी म्हटले होते. यामुळे ऑक्टोबरमधील ७.१३ अब्ज डॉलरच्या सोन्याच्या आयातीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये दुप्पट वाढ नोंदविण्यात आली होती. तसेच देशाच्या वस्तू व्यापारातील तूट नोव्हेंबरमध्ये ३७.८४ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकी पातळी पोहोचली होती. याचवेळी अर्थतज्ज्ञांचा वस्तू व्यापारातील तुटीचा अंदाज २३.९ अब्ज डॉलर होता. सरकारकडून जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे त्यावेळी वित्तीय बाजारात चिंता निर्माण झाली होती.
हेही वाचा >>>आयटीसीच्या शेअरच्या भावात घसरणीचे कारण काय? विलग झालेल्या हॉटेल व्यवसायाचे मूल्य अपेक्षेपेक्षा सरस
आता वाणिज्य गुणवत्ता आणि सांख्यिकी महासंचालक (डीजीसीआयएस) कार्यालयाने सुधारित आकडेवारी समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार नोव्हेंबरमधील सोन्याची आयात १४.८ अब्ज डॉलरवरून ९.८४ अब्ज डॉलरवर आणण्यात आली आहे. यामुळे नोव्हेंबरमधील सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. सोन्याची आयात कमी झाल्याने व्यापारी तूट कमी तेवढीच कमी झाली आहे.
तरीही आयात ११ महिन्यांच्या उच्चांकी
नोव्हेंबरमधील सुधारित आकडेवारीमुळे सोन्याची आयात कमी झाली असली तरी गेल्या वर्षी ११ महिन्यांत एकूण ४७ अब्ज डॉलरची सोन्याची आयात झाली आहे. त्याआधी २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात ४२.६ अब्ज डॉलरची सोन्याची आयात झाली होती. वर्ष २०२४ मध्ये सोन्याने भारतीय गुंतवणूकदारांना शेअर बाजारपेक्षा अधिक परतावा दिला आहे. परिणामी सोन्याची नाणी, बार आणि वळे यांची मागणी वाढली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.