नवी दिल्लीः वार्षिक तुलनेत ४.८५ टक्क्यांच्या घसरणीतून ३,२११ कोटी डॉलरवर सीमित राहिलेली भारतातील व्यापारी मालाची निर्यात, तर त्यातुलनेत आयात ६,९९५ कोटी डॉलरपर्यंत वाढल्याने, दोहोंतील तफावत अर्थात व्यापार तूट ही सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ३,७८४ कोटी डॉलरपर्यंत वधारली आहे. उल्लेखनीय म्हणजे या महिन्यांत सोने आय़ातीचे प्रमाण १,४८० कोटी डॉलर असे सार्वकालिक उच्चांकी स्तरावर होते.
जगातील दुसरा मोठा सोने आयातदार देश असलेल्या भारतात नोव्हेंबरमधील सोने मागणी लक्षणीय वाढून २०० टनांवर गेल्याचा अंदाज आहे. दर महिन्याला सरासरी ६८ टनांच्या घरात असलेली सोने आयात या महिन्यांत जवळपास तिपटीने वाढली आहे, ज्यावर १,४८० कोटी रुपये खर्च झाले. ऑक्टोबरमधील ७१३ अब्ज डॉलरच्या तुलनेत सोने आयात सरलेल्या महिन्यांत दुप्पट झाली आहे.
हेही वाचा >>>ढासळत्या रुपयातून चलन गंगाजळीला खड्डा; उच्चांकी पातळीपासून ५० अब्ज डॉलरची घट
आधीच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यात, व्यापारी मालाची निर्यात वार्षिक तुलनेत १७.२५ टक्क्यांच्या वाढीसह ३,९२० कोटी डॉलरवर गेली होती. याच महिन्यांत आयात ६,६३४ कोटी डॉलरवर होती. परिणामी व्यापार तूट ही २,७१४ कोटी डॉलर अशी होती. एप्रिल ते नोव्हेंबर अशा चालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांत, व्यापारी मालाची निर्यात ही २८,४३१ कोटी डॉलर म्हणजेच वार्षिक तुलनेत २.१७ टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात आयात मात्र वार्षिक तुलनेत ८.३५ टक्क्यांनी वाढून, ४८,६७३ कोटी डॉलरवर गेली आहे. त्यामुळे दोहोंतील तफावत या सात महिन्यांत २०,२४२ कोटी डॉलरवर कडाडली आहे.
गुंतवणुकीसाठीही सोन्याच्या मागणीत वाढ
व्यापार तुटीचे प्रमाण लक्षणीय वाढण्याचे प्रमुख कारण हे सोन्याच्या आयातीतील मोठी वाढ निश्चितच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आयात सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती भडकण्यासह, देशात सोन्याची गुंतवणूक म्हणूनही मागणी बहरणे या वाढीमागे आहे, असे एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मुख्य अर्थतज्ज्ञ – माधवी अरोरा म्हणाल्या.