Gold Jewellery Without Hallmark Difficult To Sell : भारतातील बहुतेक कुटुंबांकडे सोन्याचे दागिने आहेत. अनेक जण सोन्याला संकट काळातील साथीदार मानतात. परंतु आताची बातमी ज्यांच्या घरात हॉलमार्क नसलेले केडीएम किंवा इतर सोने आहे, त्यांच्यासाठी फार चांगली नाही. घरात पडून असलेले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड झालं आहे किंवा नवीन दागिन्यांसह त्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही खटपट करावी लागणार आहे. सरकारच्या हॉलमार्किंग नियमाच्या अंमलबजावणीमुळे हे संकट उद्भवले आहे. सरकारने १ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. याबरोबरच सोन्याच्या दागिन्यांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा लोगो आणि शुद्धता चिन्ह (जसे की 22K किंवा 18K लागू) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवणुकीपासून दिलासा मिळणार असून, खरेदीवर शुद्ध सोने मिळणार आहे. मात्र, याबरोबरच संकटही निर्माण झाले आहे. खरे तर आता हॉलमार्क नसलेले दागिने घरात पडून असल्यास ते विकणं अवघड झालं आहे. तसेच नवीन दागिने घेताना जुन्या दागिण्यांची देवाणघेवाणही करता येणंही मुश्कील आहे.
विक्री किंवा देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे आवश्यक
BIS नुसार, ज्या ग्राहकांकडे सोन्याचे दागिने अनहॉलमार्क आहेत, त्यांनी ते विकण्यापूर्वी किंवा नवीन दागिन्यांसह देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत लोकांसमोर दोन पर्याय असतील. पहिल्यांदा तुमचे दागिने बीआयएस नोंदणीकृत असलेल्या ज्वेलर्सकडे घेऊन जा. बीआयएस नोंदणीकृत ज्वेलरी हॉलमार्क न केलेले सोन्याचे दागिने बीआयएस मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्राकडे हॉलमार्क करण्यासाठी घेऊन जाईल. तेथे दागिन्यांवर हॉलमार्क करून देईल. मात्र, यासाठी ग्राहकाला प्रति वस्तू ४५ रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
हॉलमार्किंग सेंटरमध्ये वैयक्तिकरीत्या नेण्याचा पर्याय
तुमच्या घरी हॉलमार्क नसलेले दागिने असल्यास तुमच्याकडे ते कोणत्याही BIS मान्यताप्राप्त मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रात नेण्याचा आणि हॉलमार्क करून घेण्याचा दुसरा पर्याय आहे. येथे तुम्हाला प्रति वस्तू ४५ रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर चारपेक्षा जास्त दागिने ठेवल्यास २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. BIS ने जुने आणि हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने तपासण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. BIS या मान्यताप्राप्त मूल्यांकन अँड हॉलमार्किंग केंद्राने जारी केलेला नियम हे दागिन्यांच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. ग्राहक याच नियमाद्वारे कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांकडे त्याचे जुने अनहॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी घेऊन जाऊ शकतात. यानंतर ते सहजपणे त्यांची विक्री किंवा देवाणघेवाण करू शकतात.
हेही वाचाः ‘या’ बँका कमी व्याजावर देतात लाखो रुपयांचे वैयक्तिक कर्ज, परतफेड करण्यासही मिळणार बराच अवधी
‘या’ दागिन्यांना हॉलमार्क नियमातून सूट
>> ज्यांची वार्षिक उलाढाल ४० लाखांपर्यंत त्या ज्वेलर्सना सूट आहे.
>> २ ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांना सूट
>> परदेशी खरेदीदाराच्या विशिष्ट गरजेनुसार निर्यात करण्यासाठी बनवलेली कोणतीही वस्तू.
>> आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी आणि सरकारने मान्यताप्राप्त देशांतर्गत प्रदर्शनांसाठी बनवलेले दागिने.
>> वैद्यकीय, दंत, पशुवैद्यकीय, वैज्ञानिक किंवा औद्योगिक उद्देशांसाठी वापरलेली कोणतीही वस्तू.
>> सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन आणि विशेष दागिने इत्यादी.
हेही वाचाः LIC चे शेअर बाजारात आल्यानंतर एका वर्षात गुंतवणूकदारांना २.५ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या
HUID नंबर म्हणजे काय आणि यामुळे काय होणार?
आपल्याकडे अधिकृत ओळखीसाठी आधारकार्ड आहे. त्याचप्रमाणे दागिन्यांच्या ओळखीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर असतो. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. ज्यात काही आकडे आणि अक्षरं असतात, प्रत्येक दागिन्यांवर ज्वेलर्सद्वारे हा नंबर दिला जातो. या नंबरच्या मदतीने तुम्ही दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. मात्र सर्व ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर अपलोड करावी लागते. मात्र अद्याप अनेक छोटे सोने दुकानदार दागिन्यांवर केवळ हॉलमार्कचं चिन्ह देतात, पण त्यावर कोणत्याही प्रकारचा सहा अंकी नंबर देत नाहीत.