नवी दिल्ली : देशातील संघटित सोने तारण कर्ज बाजार पुढील पाच वर्षांत दुपटीने वाढून १४.१९ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज पीडब्ल्यूसी इंडियाच्या अहवालाने गुरुवारी वर्तविला. ‘स्ट्राइकिंग गोल्ड: द राइज ऑफ इंडियाज गोल्ड लोन मार्केट’ या शीर्षकाच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७.१ लाख कोटी रुपयांचे मूल्य गाठून संघटित सोने तारण कर्ज बाजाराने लक्षणीय वाढ दर्शविली आहे. पुढील पाच वर्षांत, म्हणजेच आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत वार्षिक सरासरी १४.८५ टक्क्यांच्या दराने ही बाजारपेठ १४.१९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा >>> पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज
भारतीय कुटुंबात एकत्रित २५,००० टन सोन्याचा मोठा साठा आहे. या सुवर्ण साठ्याचे मूल्य सुमारे १२६ लाख कोटी रुपये आहे. नियामक प्राधिकरणांकडून सोने तारण कर्ज देण्यासंबंधित नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. परिणामी नियमितपणे कर्ज आणि सुवर्ण मूल्य गुणोत्तर, देखभाल आणि लिलाव-संबंधित प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. परिणामी येत्या दोन वर्षांमध्ये सोने तारण कर्ज बाजारपेठेची वाढ लक्षणीय गतीने होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> Stock Market Today : ‘सेन्सेक्स’ ८१,००० अंशांवर विराजमान
आव्हानांचा पैलू
तथापि बॅंकेतर वित्तीय संस्थांकडून सोने तारण कर्जाच्या रोखीतील वितरणाच्या कमाल रकमेवर २०,००० रुपयांची मर्यादा असल्याने ग्राहकांना, असंघटित क्षेत्रावर अर्थात सावकारांकडून कर्ज घेऊन निकड भागवून घेण्यास प्रवृत्त केले जाण्याची शक्यता आहे. नियामकाने तंत्रस्नेही नवउद्यमींकडून (फिनटेक स्टार्टअप्स) कर्ज देण्याच्या पद्धतीच्या आणि त्यांच्या मूल्यांकन प्रक्रियेबद्दलदेखील चिंता व्यक्त केली आहे, असे पीडब्ल्यूसी इंडियाच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे कर्जदारांना कर्जदर आणि किमतीबाबत सावध दृष्टिकोन बाळगण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. भविष्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यास कर्ज-मूल्य गुणोत्तरासंबंधाने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.