लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत आघाडीवर देखील ग्राहकांनी खरेदी सुरू राहिल्याने मंगळवारी नवी दिल्लीत सोन्याच्या किमती ५०० रुपयांनी वाढून ९१,२५० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने स्पष्ट केले. तसेच चांदीची चकाकीही वाढली असून तिचा भाव देखील प्रति किलो १,०२,५०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकांवर पोहोचला आहे.
मुंबईत देखील स्टँडर्ड सोन्याचा (२२ कॅरेट) भाव प्रति १० ग्रॅम ८८,३५४ रुपयांवर मंगळवारी होता. सोमवारच्या तुलनेत यात २५३ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध २४ कॅरेट सोन्याचे भाव १,३०० रुपयांनी वाढून ९०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. सोन्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत नवीन विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला आहे.
मंदीच्या भीतीने अमेरिकी अर्थव्यवस्थेला ग्रासले असल्याने सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. जागतिक पातळीवर भूराजकीय तणावात वाढ झाल्यामुळे एकूणच भावना अनिश्चित आहे. शिवाय आखाती देशांमधील अस्थिरतेमुळे आणि चीनच्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहनाच्या योजनांमुळे, गुंतवणूकदारांकडून सुरक्षित आश्रय म्हणून सोन्याच्या मागणीत आणखी भर पडली आहे. जागतिक पातळीवर, स्पॉट गोल्डने प्रति औंस ३,०२८.४९ डॉलरचा नवीन उच्चांक गाठला. त्याचप्रमाणे, कॉमेक्स गोल्ड फ्युचर्सने प्रति औंस ३,०३७.२६ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांभोवती असलेली अनिश्चितता, अमेरिकेतील मंदीची भीती आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने एक आकर्षक पर्याय आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमॉडिटी विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले. शिवाय, अलिकडच्या अमेरिकी अर्थव्यवस्थेसंबंधी प्रतिकूल आकडेवारीमुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह (फेड) या वर्षी अनेक वेळा व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा देखील वाढली आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढतच जाईल, असेही गांधी म्हणाले.