नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क आकारण्यात येत आहे. यातून जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या अनिश्चिततेत, सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे ओढा वाढल्याने सुरू असलेल्या भावातील तेजीने शुक्रवारी कळस गाठला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याने प्रति औंस ३ हजार डॉलरच्या अभूतपूर्व पातळीपुढे झेप घेतली.
ट्रम्प यांनीच सोन्याच्या मागणी वाढविण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळेच वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थितरतेचे वातावरण असून, मंदीचे सावटही गडद होत आहे. ट्रम्प यांनी युरोपातून येणाऱ्या वाईनवर २०० टक्के आयात शुल्क आकारण्याचा इशारा दिला आहे. या सर्व अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत आहेत. परिणामी या मौल्यवान धातूचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी प्रति औंस ३,००४ डॉलरपर्यंत वधारला. एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम इतके वजन होते. सोन्याच्या भावाने अलिकडच्या काळात सलग १३ वेळा नवनवीन उच्चांकी पातळी गाठणारी विक्रमी तेजी दर्शविली आहे.
सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ‘गोल्ड ईटीएफ’च्या मागणीतही वाढ झाली आहे. एसडीपीआर गोल्ड ट्रस्ट या जगातील सर्वांत मोठ्या गोल्ड ईटीएफकडे सध्या सोन्याचा उच्चांकी साठा आहे. त्यांच्याकडे ९०५.८१ टनांचा साठा असून, ही ऑगस्ट २०२३ नंतरची उच्चांकी पातळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव नजीकच्या काळात प्रति औंस ३ हजार ५० डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज विश्लेषकांनी वर्तविला आहे. जगातील सोने आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय भावानुसारच ठरत असतात.
सध्या सोन्याच्या भावात तेजीचे वारे सुरू आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम राहिल्यास ही तेजी पुढेही सुरूच राहील. – नितेश शहा, कमॉडिटी तज्ज्ञ, विस्डम ट्री