मुंबई: सोन्याच्या भावाने वायदे बाजारात प्रति १० ग्रॅमला एक लाख रुपयांची पातळी गाठली आहे. यामुळे नजीकच्या काळात सोन्याच्या मागणीत घट होण्याचा भीती सराफांमध्ये आहे. मात्र असे असले तरी अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईमुळे बाजारपेठेतील वातावरण सकारात्मक राहील, असा सकारात्मक सूरही कायम आहे.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले की, सोन्याच्या भावात अचानक वाढ झाल्याने मागणीवर निश्चितच परिणाम होणार आहे. आगामी काळात मागणी स्थिरावण्याचा अंदाज आहे. सध्या आगामी अक्षय्य तृतीया आणि सध्या सुरू असलेली लग्नसराई यामुळे ग्राहकांकडून सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या भावात गेल्या वर्षी अस्थिरता असूनही मागणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली होती.
पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ म्हणाले की, सध्या बाजारपेठेत सकारात्मकता दिसून येत आहे. भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याच्या भावात अशीच वाढ सुरू राहिल्यास मागणीवर काही काळ परिणाम होऊ शकतो. मात्र, ग्राहकांमध्ये सकारात्मकता असल्याने उद्योगासाठी चांगले वातावरण आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यात तणाव वाढला आहे. याचबरोबर अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि कमकुवत होत असलेला डॉलर यामुळे सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याच्या भावातील वाढीमुळे नजीकच्या काळात मागणी कमी होणार असली तरी भविष्यात ती पुन्हा वाढण्याची आशा कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक, कॉलिन शहा यांनी व्यक्त केली.
सोन्यांत २,४०० रुपयांनी उतार
अमेरिका-चीन तणाव निवळत असल्यामुळे सोन्याच्या विक्रमी भाव तेजीला बुधवारी खंड पडला. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमती १ लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवरून २,४०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ९९,२०० रुपयांवर आल्या. मौल्यवान धातूचा भाव मंगळवारी १,८०० रुपयांनी वाढून १,०१,६०० रुपयांच्या अभूतपूर्व उच्चांकावर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सोन्याचे वायदे प्रति औंस ३,५०० डॉलरच्या उच्चांकावरून २.२ टक्के घसरणीसह ३,३४२.९० पातळीवर उतरले. तथापि जागतिक अनिश्चिततेचे दाटलेले मळभ पाहता, पुढील वर्षी सोने प्रति औंस ४,००० डॉलरपुढे गेलेले दिसेल, असा जेपी मॉर्गन या दलाली पेढीचा कयास आहे.