पीटीआय, नवी दिल्ली

सोन्याच्या भावाची विक्रमी घोडदौड सुरू असून, गुरूवारी भावाने पुन्हा विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९४ हजार ३५० रुपयांवर गेला. मात्र, चांदीच्या भावात किलोमागे १ हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या भावात सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदविण्यात आली. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम बुधवारी ९४ हजार १५० रुपये होता. त्यात गुरूवारी २०० रुपयांची वाढ होऊन भाव तो ९४ हजार ३५० रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोमागे १ हजार रुपयांची घसरण होऊन १ लाख ५०० रुपयांवर आला. सराफ आणि पुरवठादारांकडून जोरदार खरेदी झाल्याने सोन्याच्या भावातील तेजी कायम राहिली, अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली.

वस्तू वायदा बाजार मंच एमसीक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ६९५ रूपयांनी वाढून ९१ हजार ४२३ या उच्चांकी पातळीवर पोहोचला. नंतर त्यात घसरण होऊन तो ८९ हजार ८८० रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या भावाने बुधवारी ३ हजार १६७ डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अतिरिक्त शुल्काची घोषणा झाल्याने सोन्याच्या भावाने उसळी घेतली होती. मात्र, सोन्याचा भाव गुरूवारी प्रति औंस ४३.३९ डॉलरची घसरण होऊन ३ हजार ८९ डॉलरवर आला.

१४६ टन सुवर्ण रोख्यांची विक्री

सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सार्वभौम सुवर्ण रोख्यांची विक्री ६७ मालिकांमधून केली असून, त्यात एकूण १४६.९६ टन सोन्याची विक्री झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २० मार्चपर्यंत १३० टनाच्या सुवर्ण रोख्यांची विक्री झाली आणि त्यांचे मूल्य ६७ हजार ३२२ कोटी रुपये होते, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली.

गोल्ड ईटीएफमधील ओघ ९८ टक्क्यांनी वाढला

जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढत असताना आणि सोन्याच्या किमती वाढल्याने गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंडकडे (ईटीएफ) गुंतवणूकदारांचा ओढा वाढतो आहे. आयसीआरए अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये गोल्ड ईटीएफमधील ओघ ९८.५४ टक्क्यांनी वाढून १,९७९.८४ कोटींवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ९९७.२१ कोटी रुपये होता. गोल्ड ईटीएफसाठी निव्वळ व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) फेब्रुवारी २०२४ मध्ये २८,५२९.८८ कोटी होती, जी जवळजवळ दुप्पट होऊन ५५,६७७.२४ कोटी झाली आहे.