Gold Rate Today : अर्थसंकल्पानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी सोने स्वस्त झाले असून, २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ४०० रुपयांची घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत ८४,१०० रुपयांच्या आसपास आहे. सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, सामान्य ग्राहकांनाही याचा फायदा झाला आहे. असे असले तरी सोन्याचे भाव आता त्याच्या उच्चांकावरून घसरत आहेत.
एका आठवड्यात सोन्याच्या किमती ३,१०० रुपयांनी वाढल्या
दरम्यान गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३,१०० रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे तर चांदीच्या किमतीत प्रति किलो ४,००० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आज प्रति किलो चांदीचे भाव १०७,००० रुपये इतके आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पडझड आणि अमेरिकेच्या धोरणांमधील बदलांमुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून त्यात गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. अशात जर व्याजदर कमी झाले आणि बाजारात अनिश्चितता कायम राहिली तर सोने आणि चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात लग्न आणि सणांमध्ये सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे येत्या काही महिन्यांत त्याच्या किमती आणखी वाढू शकतात. असे वृत्त मनी कंट्रोलने दिले आहे.
दिल्ली-मुंबईत २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत घट
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ४०० रुपयांनी घसरून ८४,१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७७,१९० रुपये प्रति १० ग्रॅम कायम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ८४,०४० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ७७,०४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
४ फेब्रुवारी रोजीचे प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव
शहराचे नाव | २२ कॅरेट सोन्याचा भाव | २४ कॅरेट सोन्याचा भाव |
मुंबई | ७७,०४० | ८४,०४० |
दिल्ली | ७७,१९० | ८४,१९० |
चेन्नई | ७७,०४० | ८४,०४० |
कोलकाता | ७७,०४० | ८४,०४० |
देशात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारने लादलेले आयात शुल्क, कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार अशा विविध घटकांमुळे भारतात सोन्याची किंमत बदलत राहते. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर ते भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लग्न आणि सणांमध्ये त्याची मागणी वाढत असताना, त्याच्या किमतीही वाढतात. याचबरोबर लोक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात, त्यामुळे त्याच्या किमतीतील बदलाचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावरही होतो.