Gold Price Today Record High: सोनं खरेदी म्हणजे असंख्य सामान्य परिस्थितीतील घरांसाठी एक मोठी कामगिरी किंवा स्वप्न असतं. कित्येक कुटुंबांमध्ये काही वर्षं काटकसर केल्यानंतर सोनेखरेदीचा योग जुळून येतो. अनेकजण गुंतवणूक म्हणून तर अनेकांची हौस म्हणून सोनं खरेदी केलं जातं. सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची ही कारणं एकीकडे आणि सोन्याचे दिवसेंदिवस आकाशाला भिडणारे भाव इतके वाढण्यामागची कारणं दुसरीकडे. अर्थशास्त्राचा सरळ-साधा नियम सांगतो की मागणी वाढली की आपोआप किमती वाढतात आणि पुरवठा मुबलक झाला की किमती काहीशा कमी होऊ लागतात. पण सोन्याचं गणित काही एवढं सोपं नाही. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरांमध्ये तब्बल ३० टक्क्यांची झालेली अभूतपूर्व वाढ हेच तर दर्शवतेय!

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर वाढल्या आहेत. आकड्यांमध्ये सांगायचं तर गेल्या वर्षभरात हे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर २६ सप्टेंबर रोजी सोन्याच्या एक औंस अर्थात साधारणपणे २८.३५ ग्रॅमसाठी २६८५.४२ डॉलर्स इतकी किंमत मोजावी लागत होती. भारताचा विचार करता त्याच दिवशी मुंबईत एमसीएक्सचे सोन्याचे दर एक तोळा अर्थात १० ग्रॅमसाठी थेट ७५,७५० रुपयांपर्यंत पोहोचले. हे आकडे फक्त लिहिण्या-वाचण्यासाठी सोपे वाटत असले, तरी महिन्याच्या गणितात ते बसवताना सामान्यांची मोठी दमछाक होत आहे. अनेकांनी तर सोनं खरेदीचा आपला मानसच बदलला आहे!

हे सगळं का घडतंय?

भारतात सोन्याचे भाव भरमसाठ वाढण्यामागे देशांतर्गत कारणांपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरू लागल्या आहेत. नुकतंच अमेरिकेच्या फेडरल बँकेने अर्थात सोप्या भाषेत तिथल्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये ५० बेसिस पॉइंट (bps)ची कपात केली आहे. येत्या काही महिन्यांत आणखीही कपात केली जाईल, असा अंदाज आहे. एकीकडे अमेरिकेत हे घडत असताना तिकडे इस्रायल व हेझबोला यांच्यातला तणाव व रशिया-युक्रेन युद्ध या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक देशांच्या शिखर बँका सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागल्या आहेत.

अमेरिकेतील व्याजदर कपातीमुळे डॉलरची किंमत घटली आहे. त्यामुळे पत सुधारण्यासाठी अनेक देशांमधील बँका सोन्याची खरेदी करू लागल्या आहेत. “सोनं आणि अमेरिकन डॉलर यांचं व्यस्त नातं आहे. जेव्हा डॉलरची किंमत घटते, तेव्हा लोक सोन्याची खरेदी जास्त करतात”, असं निरीक्षण गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमॉडिटीज हेड हरिश व्ही यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

डॉलर घसरला की सोन्याचा आधार!

“जेव्हा विकासाचा दर मंदावतो आणि अमेरिकेकडून व्याजदर कपात होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या सुरक्षित आणि भरंवशाच्या पर्यायाचा आधार वाटतो. आम्हाला वाटतं की ही स्थिती नजीकच्या भविष्यात बदलणार नाही”, अशी प्रतिक्रिया अलकेमी कॅपिटल मॅनेजमेंटच्या सहसंस्थापक व्यवस्थापक हिमानी शाह यांनी दिली.

सोन्याची वाढती किंमत लक्षात घेता विविध देशांच्या केंद्रीय बँका अमेरिकी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याची अधिकाधिक खरेदी करत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. त्यांच्याकडील डॉलरच्या रुपातील परकीय गंगाजळीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ही खरेदी केली जात आहे. या केंद्रीय बँकांकडून त्यांच्याकडील सुरक्षित निधी फक्त डॉलरमध्ये न जमवता वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान गोष्टींमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी सोन्याची निवड होत असल्याचं मत कोटक सेक्युरिटीजच्या कमॉडिटी, करन्सी अँड इंटरेस्ट रेट विभागाचे उपाध्यक्ष अनिंद्य बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.