Gold Price Skyrockets as US-China Trade war Intensifies : स्थानिक ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमती ६,२५० रुपयांनी वाढून ९६,४५० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने याबद्दल माहिती दिली आहे.
विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक बाजारात तणाव वाढला आहे. यादरम्यान सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती सध्या इतिहासातील उच्चांक गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे.
बुधवारी ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे व्यवहार ९०,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. दरम्यान चार दिवसांचा सततच्या घसरणीनंतर ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ६,२५० रुपयांनी वाढून ९६,००० रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.
चांदीच्या किमतीत देखील २,३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आणि प्रति किलोचा भाव हा ९५,५०० रुपयांवर जाऊ पोहचला. यापूर्वी बाजार बंद झाला त्या वेळी चांदीचा भाव ९३,२०० रुपये प्रति किलोवर होता. सराफा बाजार गुरूवारी महावीर जयंतीनिमीत्त बंद होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचे भाव देखील नव्या उंचीवर पोहचले, येथे सोन्याचा प्रति औंस बाव हा ३,२३७.३९ यूएसडीवर पोहचला. याबरोबरच आशियाई बाजारातील कॉमेक्स गोल्ड फ्यूचर्स देखील विक्रमी ३,२४०.१६ यूएसडी प्रति औंसच्या उंचीवर पोहचले.
अमेरिका चीन व्यापार युद्ध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयातशुल्क) धोरणाचा परिणाम जगभरातील बाजारावर होताना दिसत आहे. ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील ७० देशांवर आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर जगभरात मोठा गदारोळ निर्माण झाला. यानंतर अखेर ट्रम्प यांनी काहीशी माघार घेत बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. मात्र, यामधून चीनला वगळण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनाने चीनवर आधी ३४ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. पण अमेरिकेच्या या निर्णयाला चीनने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा चीनवर १०४ टक्के आयात कर लादण्याची घोषणा केली. यानंतर चीननेही अमेरिकेवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केली. यानंतर अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क थेट १४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं स्पष्ट केलं. यानंतर चीनने पुन्हा एकदा अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकन वस्तूंवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यातील या ‘टॅरिफ वॉर’चा फटका जगभरातील देशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.