नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या भावातील तेजीचे वारे मंगळवारी कायम राहिले आणि मौल्यवान धातूंनी सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांनी वधारून ८१ हजार रुपयांवर गेला. याच वेळी चांदीच्या भावात किलोमागे आणखी १,५०० रुपयांची वाढ होऊन त्याने १ लाख रुपयांची पातळी ओलांडली. मुंबईच्या घाऊक बाजारात मंगळवारी शुद्ध सोन्याचे १० ग्रॅमसाठी ७८,२५० रुपयांवर, तर चांदीचे किलोमागे ९८,३७५ रुपयांवर व्यवहार सुरू होते.

हेही वाचा >>> Adani Acquires Orient Cement : अदानी समूहाच्या ताब्यात ओरिएंट सिमेंट

सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांकडून खरेदी वाढल्याने सोने तेजीत आहे. याच वेळी औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीचे भाव वाढले आहेत. दागिने आणि भांड्यांसाठीही चांदीला मागणी वाढल्याचा परिणामही दिसून येत आहे. चांदीच्या भावात सलग पाचव्या सत्रांत वाढ नोंदविण्यात आली आहे. चांदीचा भाव प्रति किलोला दीड हजार रुपयांनी वाढून १ लाख १ हजार रुपयांवर पोहोचला, अशी माहिती हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे मुख्याधिकारी अरुण मिश्रा यांनी दिली. चालू वर्षात आतापर्यंत सोन्यात तब्बल ३२ टक्क्यांची भाव तेजी दिसली आहे. वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्सवर मंगळवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला २०८ रुपयांनी वधारून ७८ हजार २४७ रुपयांवर गेला. याच वेळी चांदीचा भाव प्रति किलोला ८८२ रुपयांची उसळी घेऊन ९८ हजार ३३० रुपयांवर पोहोचला. जागतिक धातू वायदा बाजार मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ७४७ डॉलरवर गेला तर चांदीच्या भावाने ३४.४१ डॉलरची उच्चांकी पातळी गाठली.