लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचे अनुकरण करीत, भारतात सोन्याच्या वायद्याने शुक्रवारी प्रति १० ग्रॅम ५६,२४५ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आणि ऑगस्ट २०२० मध्ये स्थापित ५६,१९१ या शिखर पातळीला मागे टाकले. असे असले तरी किरकोळ सराफ बाजारात सोन्याचा भाव गेल्या आठवडाभरापासून तोळ्यामागे ५७ हजारांच्या आसपास आहे.
शुक्रवारी मुंबईच्या सराफ बाजारात स्टँडर्ड सोन्याची घाऊक किंमत प्रति १० ग्रॅम २०० रुपयांच्या तेजीसह ५६,२३६ रुपयांवर स्थिरावली, तर २४ कॅरेट शुद्ध सोन्याने ५६,४६२ रुपयांचा भाव मिळविला. चांदीचे किलोमागे व्यवहार हे ६८,११५ रुपयांवर दिवसअखेरीस बंद झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने प्रति औंस १,९०० अमेरिकी डॉलरची महत्त्वाची पातळी गाठली असून, एप्रिल २०२२ नंतरचा हा किमतीचा उच्चांक आहे. अमेरिकेतील चलनवाढीचा दर कमी झाल्याची आकडेवारी आल्यानंतर, तेथील मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्ह व्याज दरवाढीची गती कमी करेल अशी आशा वाढली आहे. सामान्यतः जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा सोन्याच्या किमती घसरतात, तर व्याज दरात उतारासरशी सोन्याच्या किमतीला लकाकी येत असते.
भाव तेजीचे कारण काय?
गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीप्रमाणे, दोन वर्षांत प्रथमच सरलेल्या डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या ग्राहक किमतीवर आधारित चलनवाढ अर्थात महागाई दरात घसरण दिसून आली. नोव्हेंबरमधील ७.१ टक्क्यांच्या तुलनेत हा दर डिसेंबरमध्ये ६.५ टक्क्यांवर ओसरला, जो त्याचा ऑक्टोबर २०२१ नंतरचा नीचांक स्तर आहे. यातून यापुढे व्याज दरवाढ होणार नाही, किंबहुना दरकपात होईल या आशेने सोन्यातील वायदे वाढून त्याची परिणती किमतीत विक्रमी वाढीने झाली.
मंदीची भीती आणि वाढत्या व्याजदरांमुळे विकसित देशांमध्ये भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण केली. त्याच वेळी, क्रिप्टोकरन्सीच्या घसरणीने गुंतवणूकदारांना सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्यातील गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्यामुळे सोन्याच्या मागणीला चालना मिळाली. सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनने कोविडबाबत शून्य सहनशीलतेच्या धोरणापासून फारकत घेत, खुल्या केलेल्या बाजारपेठेचा किमतीवर सकारात्मक परिणाम साधला. तथापि किमतीतील ताजी तेजी ही या मौल्यवान धातूच्या मागणीला मारक ठरू शकण्याची शक्यताही विश्लेषक वर्तवत आहेत.